पुणे | बालगुन्ह्यांमध्ये बालक कोणाला म्हणायचे, हा चिंतेचा विषय

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या सर्वेक्षणानुसार चांगल्या घरातील, श्रीमंत आणि उच्चशिक्षित पालकांची मुले अनेक हिंसक गुन्ह्यांमध्ये अपराधी दिसून आले आहेत. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनच्या म्हणण्यानुसार १८ वर्षांखालील मुलांना बालक म्हणता येते.
इतर काही संस्था १४ वर्षांखालील मुलांना बालक म्हणतात. नेमके बालक कोणाला म्हणायचे, या व्याख्येत असलेल्या गोंधळाचा फायदा अनेक गुन्हेगार घेतात, असे परखड मत माजी पोलीस महासंचालक डॉ. प्रवीण दीक्षित यांनी मांडले.
हिंदू महिला सभेच्या वतीने आणि डॉ. दीक्षित यांच्या हस्ते ज्येष्ठ समाजसेविका डॉ. अनुराधा सहस्रबुद्धे यांचा कै. लीलावती फळणीकर स्मृतीप्रित्यर्थ सजग पुरस्कार देऊन तर सर्पमित्र नीता गजरे-कुसळ यांना साहस पुरस्कार देत सन्मानित करण्यात आले. हिंदू महिला सभेच्या अध्यक्षा सुप्रिया दामले, आपलं घर या संस्थेचे विजय फळणीकर आदी उपस्थित होते.
ज्या मुलांना आई वडील नाहीत, जी मुले उघड्यावर मोठी होतात. ती मुले पुढे जाऊन गुन्हेगार होतात, हा आपल्या समाजातील समज हा चुकीचा आहे. तर, सुशिक्षित, श्रीमंत घरातील मुले हिंसक कृत्यात सहभागी होत आहेत. या परिस्थितीला ती मुले नाहीत, तर त्यांचे पालक जबाबदार आहेत. या मुलांना गुन्ह्यांपासून परावृत्त कसे करायचे आणि सक्षम कसे करायचे यावर काम करावे लागणार आहे, असे डॉ. दीक्षित म्हणाले.
समाजाचा विकास करायचा असेल तर केवळ रस्ते, वीज आणून तो विकास होणार नाही. माणसांचा विकास होतोय का हे जास्त महत्त्वाचे आहे. लहान मुलांमध्ये लैंगिक शोषण, पॉर्नचे वाढते व्यसन या बाबींकडे आपण लक्ष देऊन त्याबद्दल मुलांमध्ये जागृती करायला हवी आहे, असे डॉ. सहस्त्रबुद्धे म्हणाल्या. सुप्रिया दामले यांनी प्रास्ताविक केले. सुधा राजगुरू यांनी आभार मानले. वंदना जोगळेकर यांनी सूत्रसंचालन केले.
भ्रष्टाचार करत अनेकदा अनेक जण या गुन्हेगारांना वाचवण्यासाठी झटतात. पुण्यातील पोर्शे कार अपघात आणि पूजा खेडकर प्रकरणामध्ये आपण हा भ्रष्टाचार पाहिला आहे. – डॉ. प्रवीण दीक्षित, माजी पोलीस महासंचालक




