पुणे जिल्हा | इंदापूर तालुक्यात वळीव पावसामुळे द्राक्ष बागांच्या कामांना गती

इंदापूर, (प्रतिनिधी) – मागील तीन ते चार दिवसापासून इंदापूर तालुक्यामध्ये पडत असलेल्या वळीव पावसामुळे कमाल आणि किमान तापमानामध्ये तीन ते चार अंश सेल्सिअस ची घट झाल्याचे जाणवत आहे.सापेक्ष आद्रतेतही वाढ झाल्यामुळे द्राक्ष बागायतदारांच्या खरड छाटणी हंगामातील कामांना चांगलीच गती या वातावरणाचा फायदा घेत द्राक्ष बागायदारांनी घेतलेली आहे.
खऱ्या अर्थाने इंदापूर तालुक्यात द्राक्ष बागेची सुरुवात बोरी गावातील शेतकऱ्यांनी धाडस वृत्तीने मागील वीस वर्षांपूर्वी केली.या भागात बागा टिकल्या पाहिजेत,जपल्या पाहिजेत,यासाठी मार्गदर्शन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील बारामती कृषी केंद्राचे राजेंद्र पवार यांनी वेळोवेळी केले.
तर, द्राक्ष बागायदारांना संकटाच्या वेळेस खुद्द शरद पवारांनी मदत केल्यामुळे या द्राक्ष बागेतून हमखास उत्पन्न शेतकरी मिळवत गेला. बोरी गावापासून नीरा नरसिंहपूर गावापर्यंत,प्रत्येक गावात शेतकऱ्यांनी द्राक्ष बाग मोठ्या हिमतीने जोपासलेली दिसते आहे. हवामानाचा पावसाचा फटका बागायदारांना,बागांना बसतो. मात्र, यातून सावरणारा द्राक्ष बागायदार शेतकरी इंदापूर तालुक्यात निर्माण झाला आहे.
कृषी केंद्राचे संचालक राजेंद्र वाघमोडे यासंदर्भात माहिती देताना म्हणाले की, चालू वर्षीचा उन्हाळा कोरडे हवामान व जास्त तापमानामुळे फळबागांसाठी विशेषता द्राक्ष बागांसाठी फारच अडचणीचा ठरत होता. प्रत्येक द्राक्ष बागायतरांकडे शेततळ्यांची व्यवस्था असल्यामुळे,बागायतदारांनी चांगल्या पद्धतीने आपापल्या बागा जोपासून उन्हाळी हंगामातील कामांमध्ये सातत्य ठेवून बागांची कामे चालू ठेवली होती,अशी माहिती कृषी केंद्राचे राजेंद्र वाघमोडे यांनी दिली.
लाखेवाडी परिसरातील द्राक्ष बागायतदार श्रीमंत ढोले म्हणाले की, सापेक्ष आद्रतेतील वाढ, तसेच तापमानातील घटीमुळे द्राक्ष वेलींच्या शरीर शास्त्रीय हालचालीमध्ये वाढ होताना दिसत आहे. बऱ्याच बागा विरळणी,सबकेन,सुपर सबकेन, शेंडाबाळी इत्यादी कामे करण्याच्या अवस्थेत आहेत.
फवारण्या सुरू…
बागायतदार बुरशीनाशक, कीटकनाशकांच्या फवारण्यांबरोबरच जिब्रेलिनचे प्रमाण कमी करून सायटोकायनीनचे प्रमाण वाढविण्यासाठी फवारण्या करताना दिसत आहेत. जेणेकरून द्राक्ष काड्यांमध्ये सशक्त घड निर्मिती होण्यास मदत होणार आहे. इंदापूर तालुक्यातील रामवाडी, लाखेवाडी,शेटफळहवेली,बावडा,पिठेवाडी,या भागातील शेतकऱ्यांनी वळीव पावसामुळे द्राक्ष बागात कामाला गती दिली आहे.





