हडपसर : क्षणात संसार उघड्यावर; घरासह संसारोपयोगी साहित्य जळून खाक

हडपसर(प्रतिनिधी) :- हडपसर वैदुवाडी बिराजदारनगर येथे पत्रांच्या घरांना आग लागून बारा ते पंधरा कुटुंबाच्या संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाल्या आहेत. रात्री झोपलेल्या नागरिकांना स्थानिक इतर नागरिकांनी सुखरूप बाहेर काढल्याने जीवितहानीची मोठी दुर्घटना टळली. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही आग लागली होती.हडपसर अग्निशामक केंद्राच्या दोन गाड्यांच्या द्वारे आग आटोक्यात आणण्यात आली. आग कशाने लागली याचे कारण अद्यापही समजू शकले नाही. याप्रकारे हडपसर पोलीस ठाण्यात आगीच्या घटनेची नोंद करण्यात आली आहे. बारा जनांचे घर संसार व त्यांच्या मुलांचे शाळेतील साहित्य जळून खाक झाले आहे.
हडपसर अग्निशामक दलाचे केंद्रप्रमुख प्रमोद सोनवणे यांनी सांगितले की, रविवारी पहाटे रात्रीच्या वेळेस तीन वाजण्याच्या सुमारास बिराजदार नगर येथे आग लागल्याचा कॉल आला होता त्यानुसार हडपसर येथील आगीचा बंब देवदूत व मुख्य केंद्रातून एक टँकर घटनास्थळी दाखल झाला. एका घराला लागल्यामुळे आग दुसऱ्या घराला लागले होते अशाप्रकारे बारा पत्र्याच्या घरांना आगीने घेरले होते.
घरामधील संसार उपयोगी वस्तू व छतावरील लाकूड- पत्रे जळून खाक झाले होते. आमचे जवान येण्याअगोदरच घरात झोपलेल्या नागरिकांना इतर नागरिकांनी सुखरूप बाहेर काढले होते. काही वेळातच आम्ही आग आटोक्यात आणली. त्यामुळे शेजारील इतर पत्रांच्या घरांना आग लागण्यापासून रोखता आले. पहाटे पाच वाजेपर्यंत कुलिंग चे काम चालू होते. आग कशाने लागली याचे कारण समजू शकले नाही. याबाबतचा पंचनामा अग्निशामक केंद्राकडून करण्यात आला आहे.
तातडीने पंचनामे करून मदत करा ; खासदार डॉ . कोल्हे यांच्या महापालिका प्रशासनाला सूचना
हडपसर येथे आग लागून अनेकांचे संसार उध्वस्त झाल्याची दुर्दैवी घटना समजली. त्यानंतर तत्काळ पुणे महानगरपालिका वानवडी क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी शाम तारू यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधला व सदर घटनेची माहिती घेतली. तसेच ताबडतोब पंचनामे करून बाधित नागरिकांना मदत करण्याचा सूचना केल्या. त्यावर त्यांनी आजच पंचनामे करण्यास सुरुवात करणार असून पत्र्याचे शेड, भांडी आदींकरिता 10 ते 15 हजार रुपयांची मदत दिली जाणार असल्याचे सांगितले! सध्या बाधित कुटुंबियांना रक्षकनगर येथील मनपा शाळेच्या हॉलमध्ये स्थलांतरित केले आहे.





