पुणे | गांजा सापडल्याप्रकरणात विद्यापीठात लपवाछपवी

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात एका विद्यार्थ्याकडे गांजा सापडला. या प्रकरणी कारवाईस विलंब झाल्याच्या निषेधार्थ काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर व शिवसेना- ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीकुलगुरूंची भेट घेत प्रशासनाला जाब विचारला. या प्रकरणी तत्काळ कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
गांजा घेऊन येणाऱ्या विद्यार्थ्यावर कारवाई का केली नाही? याचा जाब विविध संघटनांनी विद्यापीठ प्रशासनाला विचारला. विद्यापीठाने याप्रकरणी चौकशी करण्यासाठी समिती स्थापन केली होती. परंतु, पोलिसांना या घटनेचा तपशील का दिला नाही? यावर विद्यार्थी संघटनांनी आक्षेप घेतला. या सर्व प्रकरणात धंगेकर यांनी विद्यापीठातील अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
अंधारे म्हणाल्या, “विद्यापीठात गांजा सापडल्यानंतर 13 दिवस उलटून गेले तरीही कारवाई का केली नाही? अशा कोणत्या प्रकारची प्रक्रिया विद्यापीठाकडून केली जात होती, याचा खुलासा विद्यापीठाने करावा.’
या वेळी शिवसेना शहराध्यक्ष गजानन थरकुडे, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अक्षय जैन, युवा सेना शहर प्रमुख राम थरकुडे, भूषण रानभरे, उमेश वाघ, राहूल शिरसाठ आदी उपस्थित होते.





