शिरुर : आंबेगाव – शिरूर मतदारसंघातील गावागावांमध्ये उत्साहात व शांततेत चांगले मतदान झाले. यंदा पहील्यांदाच विधानसभेला मतदानाचा टक्का वाढला असून तब्बल ७० % मतदान झाले आहे. त्यामूळे वाढणारा टक्का कोणाच्या पथ्यावर पडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. या मतदारसंघात महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिलीप वळसे पाटील व महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे देवदत्त निकम हे दोन प्रमुख उमेदवार होते. सर्व मिळून ११ उमेदवार रिंगणात होते. ही निवडणूक शेवटपर्यंत चुरशीची होती. मतदान झाल्यानंतर कुणाची सरशी होणार आणि कोण तोंडघशी पडणार याबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत. मात्र, मतदार हुशार असल्याने आंबेगावात ‘घड्याळ चालणार, की तुतारी वाजणार’ अशा चर्चांनी सोशल मीडियावर जोर धरला आहे. मध्यंतरीच्या राजकीय घडामोडींनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडले. यावेळी दिलीप वळसे पाटील यांनी डिंभा धरणाच्या बोगद्याच्या कारणामुळे शरद पवार यांची साथ सोडत अजितदादा यांची साथ दिली. मग देवदत्त निकम यांनी वळसे पाटील यांना साथ न देता राष्ट्रवादी विभाजनाचा फायदा घेत संधी शोधत हातात तुतारी घेत उमेदवारी मिळविली. गुरु-शिष्यांच्या लढाईमुळे ही निवडणूक चांगलीच चुरशीची झाली. त्यामुळे ही निवडणूक यापूर्वीच्या निवडणुकांपेक्षा एकदम वेगळी ठरली. मतदान संपल्यानंतर अनेक ठिकाणी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा दावा केला आहे. अनेक ठिकाणी आपापल्या उमेदवारांसाठी अतिउत्साही कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत गाव पातळीवरील लक्ष्मी दर्शन,ढाब्यांपासून ते पंचतारांकित हाॅटेल मधील जेवणावळी सारख्या छोट्या मोठ्या पैजा लावल्या आहे. मात्र, काहींनी ‘मतदार हुशार, अंदाज चुकणार !’ असे स्टेट्स ठेवले आहे. मात्र, राजकीय तज्ञ मंडळी यावर ठामठोक पणे बोलायला तयार नाही. संमिश्र जनभावनेमुळे ठोस अंदाज बांधणे अनेकांना कठीण जात आहे. गतवेळीच्या निवडणूकीत ६६.८७ टक्के मतदान झाले होते. यावेळी ७०.०१ टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे आंबेगावात ‘घड्याळ चालणार, की तुतारी वाजणार’? अशा चर्चांना सोशल मीडियावर उधाण आले आहे. वाढलेला मतांचा टक्का आणि नवमतदारांची पसंती कोणाच्या पारड्यात विजयाचे दान टाकतात. हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. आकडेवारी आंबेगाव विधानसभा निवडणुक सन (वर्ष) टक्केवारी २००९……… ६८.८८ २०१४……… ७१.६५ २०१९……… ६६.८७ २०२४……… ७०.०१