Imran Khan : सरकारबरोबरच्या चर्चेवर इम्रान यांच्या पक्षाचा बहिष्कार

इस्लामाबाद : पाकिस्तान सरकार आणि विरोधकांमध्ये सुरू असलेल्या चर्चेच्या चौथ्या फेरीवर माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरिक ए-इन्साफ पक्षाने बहिष्कार घातला आहे. चौथ्या फेरीतील चर्चा आज होणार होती. मात्र पीटीआयचे प्रतिनिधी या बैठकीमध्ये सहभागी झाले नाहीत. सरकारच्या विनंतीवरून संसदेचे सभापती अयाज सादिक यांनी या चर्चेसाठी मध्यस्थी केली होती.
संसदेच्या आवारातच ही बैठक होणार होती. सरकारच्या प्रतिनिधी बरोबर सादिक यांनी पीटीआयच्या प्रतिनिधींची वाट बघितली. मात्र पीटीआयचे प्रतिनिधी बैठकीसाठी आलेच नाहीत. 9 मे 2023 आणि 26 नोव्हेंबर 2024 रोजीच्या आंदोलनासंदर्भात पीटीआयवरील खटल्यांची चौकशी करण्यासाठी न्यायिक आयोग स्थापन करण्याची अट सरकारकडून पुर्ण केली गेली नसल्यामुळे या चर्चेमध्ये सहभागी न होण्याचे आदेश इम्रान खान यांनी आपल्या प्रतिनिधींना दिले होते.
देशभरात निर्माण झालेला तणाव कमी करण्याच्या उद्देशाने गेल्या महिन्यापासून सरकार आणि पीटीआयमधील चर्चेला सुरुवात झाली. चर्चेच्या तीन फेऱ्या देखील पार पडल्या आहेत. मात्र न्यायिक आयोग स्थापन न झाल्यामुळे पीटीआयने सरकारला 7 दिवसांची मुदत दिली होती. याच मुद्यावरून चौथ्या फेरीमध्ये चर्चा केली जाईल, असे सरकारने म्हटले होते. मात्र आता ही बैठकच होऊ न शकल्यामुळे वाटाघाटी फिसकटण्याची चिन्हे आहेत.





