Imran Khan : पाक सरकारकडून इम्रान यांच्याशी चर्चेसाठी कमिटी स्थापन

इस्लामाबाद : पाकिस्तानमधील शहबाज शरीफ यांच्या सरकारने माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरिक ए-इन्साफ पक्षाबरोबर चर्चेसाठी एक कमिटी स्थापन केली आहे. पीटीआय पक्षाने असहकार आंदोलन छेडण्याचा इशारा दिल्यावर सरकारने चर्चेसाठी अनुकूलता दाखवत हे पाऊल उचलले आहे.
पीटीआयबरोबरच्या चर्चेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या या कमिटीमध्ये उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार, पंतप्रधानांचे राजकीय सहाय्यक राणा सनाउल्लाह, शिक्षण मंत्री खालिद मकबूल सिद्दीकी, खाजगीकरण मंत्री अलीम खान, धार्मिक व्यवहार मंत्री चौधरी सालिक हुसेन आणि सिनेटर इरफान सिद्दीकी आदींचा समावेश आहे.
सरकारने चर्चेची तयारी दाखवत कमिटी नियुक्त केल्याचे पीटीआयच्यावतीने स्वागत करण्यात आले आहे. हे एक सकारात्मक पाऊल असून या चर्चेद्वारे अर्थपुर्ण संवाद होईल, अशी आशा वाटत असल्याचे पक्षाचे अध्यक्ष बॅरिस्टर गोहर अली खान यांनी म्हटले आहे. संभाव्य चर्चेची निश्चित कालमर्यादा असायला हवी आणि परिस्थितीची संवेदनशीलता लक्षात घेऊन संवाद सकारात्मकपणे पुढे गेला पाहिजे, यावर त्यांनी भर दिला.
सरकार आणि पीटीआयमध्ये सकारात्मक चर्चा व्हावी यासाठी संसदेचे सभापती सरदार अयाज सादिक यांनी विशेष पुढाकार घेतला. त्यांनी बुधवारी दोन्ही बाजूंचे यजमानपद आणि त्यांच्यात संवाद साधण्यास तयार असल्याची तयारी दाखवली होती. त्यांनी नव्याने स्थापन केलेल्या समितीचे स्वागत केले. तसेच सरकार आणि विरोधकांना चर्चेसाठी आमंत्रित केले, सभापतींचे कार्यालय सदस्यांसाठी नेहमीच खुले असते, असेही त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.
सोमवारी सकाळी आपल्या दालनामध्ये दोन्ही बाजूच्या नेत्यांनी चर्चेसाठी उपस्थित रहावे, असेही त्यांनी म्हटले आहे. पीटीआयने सभापतींच्या भेटीचे निमंत्रण स्वीकारले आहे. त्यांची समिती सोमवारी बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे पीटीआयचे प्रवक्ते शेख वकास अक्रम यांनी सांगितले. इम्रान खान यांना या घडामोडींबद्दल कळवण्यात येणार आहे.
त्यानंतर नियोजित असहकार आंदोलन मागे घेण्याबाबतचा निरणय इम्रान खान स्वतःच घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान पक्षाच्या मागण्या पूर्ण न झाल्यास उद्या (सोमवार) पासून सविनय कायदेभंग मोहीम सुरू केली जाईल. याचा पीटीआयचे प्रवक्ते शेख वकास अक्रम यांनी पुनरुच्चार केला आहे.





