Imran Khan : जुलूमशाहीपुढे झुकण्यापेक्षा आजीवन तुरुंगात राहेन; इम्रान खान यांनी स्पष्ट केली भूमिका

लाहोर : जुलूमशाही आणि दडपशाहीपुढे झुकण्यापेक्षा आपण आजीवन तुरुंगात रहायला तयार आहोत, असे तुरुंगात असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरिक ए इन्साफ पक्षाचे संस्थापक उम्रान खान यांनी म्हटले आहे. देशातील लष्कराबाबत ते बोलत होते. दोनच दिवसांपुर्वी इम्रान खान यांनी सत्तारुढ आघाडी सरकारशी चर्चा करण्यापेक्षा लष्कराशी चर्चा करायला आपण तयार असल्याचे म्हटले होते. आज लष्कराबाबत देखील त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
इम्रान खान गेल्या दोन वर्षांपासून तुरुंगात आहेत. त्यांच्यावर भ्रष्टाचार, पदाचा गैरवापर आणि दहशतवादी कारवायांसारखे अनेकखटले दाखल करण्यात आले आहेत. इम्रान खान यांनी तुरुंगातूनच सरकारविरोधात देशव्यापी आंदोलन देखील पुकारले आहे. जुलूमशाही आणि दडपशाहीपुढे झुकण्यापेक्षा आपण आयुष्यभर तुरुंगात चक्की दळण्यास तयार आहोत. माझ्या चळवळीचा मुख्य उद्देश कायद्याचे राज्य प्रस्थापित करणे हा आहे. या कायद्याच्या राज्याच्या स्थापनेमुळे पाकिस्तानातील जंगल राज समाप्त होईल, असे इम्रान खान यांनी एक्सवरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
राजकीय पक्षाचे सर्व दरवाजे बंद होतात. पक्षाच्या सदस्यांवर अन्यायाने कारवाई होते आणि न्यायव्यवस्था तटस्थ रहात नाही, तेंव्हा शांततेने आंदोलन करणे हा एकमेव मार्ग शिल्लक राहतो, असेही इम्रान खान यांनी म्हटले आहे. इम्रान खान यांनी आपले समर्थक, पीटीआय पक्षाचे सदस्य आणि कार्यकर्त्यांना देशभर जोरदार आंदोलन करण्याची सूचना देखील केली आहे. यावेळी आपण केवळ इस्लामाबादला आवाहन करणार नाही. तर यावेळी आपण संपूर्ण पाकिस्तानला उठाव करण्याचे आवाहन करणार आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.
इम्रान खान यांच्या अटकेनंतर झालेली ९ मे २०२३ रोजीची दंगल बनावट होती, असे सांगून इम्रान खान यांनी ९ मे रोजीच्या सीसीटिव्हीचे चित्रीकरण तपासण्याचे आवाहन केले. ज्यांनी सीसीटिव्हीचे फुटेज चोरले, ते खरे दोषी आहेत. जर ९ मे रोजीच्या दंगलीला पीटीआय जबाबदार आहे, असे लष्कराला वाटत असेल, तर हे सीसीटिव्हीचे फुटेज लष्कराने प्रसिद्ध करावे, असेही इम्रान खान यांनी म्हटले आहे.
आपल्या पॉलिग्राफ टेस्टबद्दल बोलताना पंतप्रधान शहबाझ शरीफ यांची देखील पॉलिग्राफ टेस्ट करावी, अशी मागणीही इम्रान यांनी केली आहे. अददियाळा तुरुंगात सामान्य कैद्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधाही आपल्याला दिल्या जात नाहीत. आपल्या मुलांशीही संवाद साधू दिला जात नाही. वाचायला पुस्तके दिली जात नाहीत. पक्षाच्या नेत्यांनाही भेटू दिले जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला.





