Imran Khan : इम्रान खान यांनी लष्कर प्रमुखांना पत्र पाठवले नाही; पाक लष्कराने फेटाळला पीटीआयचा दावा

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी पाक लष्कराचे प्रमुख जनरल आसिम मुनीर यांना कोणतेही पत्र पाठवले नव्हते, असे पाक लष्कराच्यावतीने आज स्पष्ट करण्यात आले. पीटीआयच्या नेत्यांनी यापत्रासंदर्भात केलेला दावा पाक लष्कराने फेटाळून लावला आहे.
पाक लष्कराने आपल्या धोरणांचे फेरमुल्यांकन करावे, अशी मागणी करणारे पत्र इम्रान खान यांनी जनरल आसिम मुनीर यांना लिहीले होते, असा दावा पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ पक्षाचे अध्यक्ष गौहर अली खान आणि इम्रान खान यांचे वकिल फैजल चौधरी यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना केला होता. या पत्रासंदर्भातले वृत्त लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाकारले आहे. हा पत्रव्यवहार औपचारिक नव्हता, असे लष्कराच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
लष्कराला अशा आशयाचे कोणतेही पत्र मिळालेले नाही. असे संरक्षण सूत्रांनी म्हटले आहे. असे कोणतेही पत्र अस्तित्वातच नसून लष्कराला ते स्वीकारण्यात रस नव्हता असेही संरक्षण अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. पीटीआयच्या नेतृत्वाने आणखी एक ड्रामा केला आहे. जर पीटीआयला खरोखर चर्चा करायची असती, तर लष्कराऐवजी राजकीय नेत्यांशी संपर्क साधला असता.
जरी लष्कराला असे पत्र पाठवले असते तरी त्यामध्ये लष्कराला स्वारस्य नव्हते, असेही स्पष्ट केले गेले आहे. दरम्यान इम्रान खान यांनी पीटीआयचे प्रमुख आणि माजी पंतप्रधान या नात्याने जनरल मुनीर यांना सहा कलमी पत्र पाठवले होते, असे चौधरी यांनी रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगाबाहेर बोलताना स्पष्ट केले.





