Imran Khan : बिलावल हे अज्ञानी राजकारणी बालक; इम्रान खान यांची टीका

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी हे अज्ञानी राजकारणी बालक असल्याची टीका माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी केली आहे. भारताबरोबरच्या संबंधांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी भारताला हवे असलेल्या व्यक्तींचे प्रत्यार्पण केले जाऊ शकते, असे बिलावल भुट्टो म्हणाले होते. त्यावर खान यांनी ही टीका केली आहे.
लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख हाफिज सईद आणि जैश-ए-मुहम्मदचा प्रमुख मसूद अझहर यांचे प्रत्यार्पण करण्याबाबतच्या प्रश्नाला ते उत्तर देत होते.मात्र बिलावल हे अज्ञानी राजकारणी बालक असल्याचे सांगून इम्रान खान यांनी हा प्रस्तावच खोडून काढला. बिलावल यांचा प्रस्ताव चुकीचा होता आणि पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी हानिकारक होता. अशा विधानांमुळे आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर देशाचा अपमान होतो.
बिलावल भारताला खुश करण्यास इतके उत्सुक का आहे हे आपल्याला समजत नाही, असे इम्रान यांच्या प्रवक्त्यांनी सांगितले. बिलावल यांच्याकडे राजकीय शहाणपण, दूरदृष्टी आणि प्रादेशिक भू-राजकारणाची समज नसल्याचे ते वारंवार सिद्ध करत आहेत. पाकिस्तानच्या परराष्ट्र धोरणाच्या चर्चेत बिलावल गोंधळ आणि विरोधाभासाचे प्रतीक बनले आहेत, असेही इम्रान खान यांच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे.





