रायगड – गेल्या आठवड्यात बुधवारी रात्री (दि. 19 जुलै) ईर्शाळवाडीवर दरड कोसळली होती. येथील दुर्घटनाग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक हात पुढे सरसावले आहेत. बऱ्याच वस्तूंची मदत घेऊन शेकडो सामाजिक संस्था आणि सामाजिक कार्यकर्ते इर्शाळवाडीला पोहोचत आहेत. मात्र येथील लोक तात्पुरत्या स्वरुपात कंटेनरमध्ये राहत आहेत, हे कंटेनर छोट्या आकाराचे असून त्यात राहण्याइतकी सोय आहे. अशात विविध संस्थांनी दिलेल्या वस्तूंची साठवणूक करुन हे कंटेनर सामानांनीच भरले आहेत. त्यामुळे वस्तूरूपी मदतीऐवजी दरडग्रस्तांना आर्थिक मदत करण्याचा उपाय करण्यात आला आहे.
दरम्यान, इर्शाळवाडी परिसरात सध्या जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. बाहेरील व्यक्तींना या गावात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. जर तुम्ही एखादी मदत घेऊन इर्शाळवाडीला पोहोचवणार असाल तर चौक गावापासून पुढे तुम्हाला जाता येणार नाही. तसेच प्रशासनाने सद्य स्थितीमध्ये या दुर्घटनाग्रस्तांना सर्वोतोपरी आवश्यक असलेली मदत केली आहे. त्यांच्या कायमस्वरूपी निवाऱ्याची तजवीज सध्या प्रशासन करत आहे, त्यामुळे आपणास मदत करायची असल्यास निधीच्या स्वरुपात तुम्ही मदत करू शकता. यासाठी जिल्हा प्रशासनाने खाली बँक खात्याची माहिती दिली आहे.
खात्याचे नाव: जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधी (District Disaster Response Fund)
बँकेचे नाव: स्टेट बँक ऑफ इंडिया, मुख्य शाखा , अलिबाग (State Bank of India, Alibag)
बँक खाते क्रमांक : 38222872300
IFSC Code : SBIN0000308
या बँक अकाऊंटवर तुम्ही आर्थिक मदत देऊन दरडग्रस्तांची मदत करू शकता.
त्याचबरोबर इर्शाळवाडी गावाशी संबंधित तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांना संपर्क करुन तुम्ही इतर स्वरुपातील मदत करू शकता. त्याचा संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे.. श्री.दीक्षांत देशपांडे (सबंधित तहसीलदार) – 91 58157493 / +91 866-905-6492
इर्शाळवाडी परिसरात पर्यटक, नागरिकांना बंदी
इर्शाळवाडी परिसरात पर्यटक, नागरिकांना प्रवेश बंदी लागू करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे दरड कोसळलेल्या घटनास्थळी आणि त्याच्या परिसरात इर्शाळगड, नंबराची वाडी येथील दुर्घटनास्थळी, बेस कॅम्प परिसरात शासकीय मदत यंत्रणा तसेच मदतकार्यात नेमणूक केलेल्या इतर व्यक्ती, सेवाभावी संस्था यांच्या व्यतिरिक्त इतर नागरिक, ट्रेकर्स यांना प्रवेशास निर्बंध घालण्यात आला आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) नुसार दिनांक 23 जुलै ते दिनांक 6 ऑगस्ट या कालावधीसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.