पुणे | ग्रामीण आणि पिंपरीसाठी महत्त्वाची ; “लाडकी बहीण’ योजनेसाठी सर्वाधिक अर्ज ऑफलाइन

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेबाबत पुणे जिल्हा परिषदेमार्फत अर्ज भरून घेतले जात आहेत. यामध्ये सध्या ऑफलाइन पद्धतीने मोठ्या प्रमाणावर अर्ज आले आहेत, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी दिली आहे.
गावातील अथवा त्या त्या वार्ड मधील सर्व पात्र लाभार्थ्यांचे ऑफलाइन पद्धतीने हार्ड कॉपी अर्ज अंगणवाडी सेविकांकडे जमा करण्यात येत आहेत. अर्जांची नोंद अंगणवाडी स्तरावर घेण्यात येत असून त्याबाबतच्या नोंदी ठेवण्यात येत आहेत.
सर्व नोंद झालेल्या लाभार्थींच्या नावांचे प्रत्येक शनिवारी चावडी वाचन केले जाईल. त्यात आक्षेप असल्यास पात्र, अपात्रतेबाबत गाव पातळीवरच खातरजमा करून तालुकास्तरावर समितीने अंतिम मान्यता दिली जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थीना लाभ उपलब्ध व्हावा व कोणीही पात्र लाभार्थी या योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये याची प्रशासनामार्फत दक्षता घेण्यात येत आहे, असेही पाटील यांनी सांगितले.
आतापर्यंत जिल्ह्यात ऑफलाइन पद्धतीने ८९ हजार ९७ अर्ज तर ऑनलाईन पद्धतीने ४५ हजार ४०१ असे एकूण १ लाख ३४ हजार ४९८ अर्ज प्राप्त झाले आहेत. यात ऑनलाईन व ऑफलाईन असे दोन्ही मिळून आंबेगांव तालुक्यात १६ हजार २७६ अर्ज प्राप्त झाले आहेत. बारामती १७ हजार ५०९, भोर ४ हजार ३७६, दौंड ७ हजार १०८, इंदापूर १० हजार ८४, हवेली १० हजार ६६५, जुन्नर १२ हजार ८४३, खेड १० हजार ३४, मावळ १३ हजार १८३, मुळशी ५ हजार ४५६, पुरंदर ९ हजार ७१८, शिरुर १५ हजार ८४२ वेल्हा तालुक्यात १ हजार ४३४ अर्ज प्राप्त झाले आहेत.





