आठवडाभरात ठाकरे सरकारने घेतलेले महत्वाचे निर्णय! वाचा सविस्तर

दि. 19 जानेवारी  2020

 • राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते 17 व्या टाटा मुंबई मॅरेथॉनचे उद्घाटन. 55 हजार स्पर्धकांचा सहभाग.
 • मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते टाटा मुंबई मॅरेथॉनच्या ‘ड्रीम रन’ स्पर्धेचे उद्घाटन.
 • पुणे जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या वतीने पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या हस्ते शुभारंभ.
 • बृहन्मुंबई पोलीस दलात 88 वर्षांनी अश्वदळाचा (माऊंटेड पोलीस युनिट) समावेश. 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी शिवाजी पार्क येथे होणाऱ्या ध्वजारोहनाच्या मुख्य शासकीय समारंभातील संचलनात हे पथक सहभागी होणार असल्याचे गृहमंत्री श्री. अनिल देशमुख यांची माहिती.
 • सन 2020 च्या हज यात्रेसाठीची संगणकीय सोडत (लॉटरी) अल्पसंख्याक मंत्री श्री.नवाब मलिक यांच्या उपस्थितीत जाहीर.  सोडतीत राज्यातील 10 हजार 408 जणांची हज यात्रेसाठी निवड.
 • अंगणवाड्यांच्या जागाभाड्यात वाढ करण्यास महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांची मान्यता.
 • कोल्हापूर येथे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्मारक लोकार्पण सोहळा खासदार श्री. शरद पवार यांच्या हस्ते आणि श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न.  या कार्यक्रमास महसूलमंत्री श्री. बाळासाहेब थोरात, पालकमंत्री श्री. सतेज ऊर्फ बंटी पाटील, ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री  श्री. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची उपस्थिती.
 • 45 बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या नियुक्तीस महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांची मान्यता.
 • प्राथमिक आरोग्य सुविधा बळकटीकरणावर भर देण्यासाठी मार्चअखेर 6500 आरोग्यवर्धिनी केंद्र कार्यान्वित करण्याचा आरोग्यमंत्री श्री. राजेश टोपे यांचा निर्णय.

दि. 20 जानेवारी 2020

 • सर्व विभागीय आयुक्त कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष सुरु; या कक्षामुळे सर्वसामान्यांना दिलासा.
 • सिंधुदुर्ग येथील बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारकासाठी उर्वरित निधी बांधकामाची प्रगती तपासून द्या व स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करा. मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांचे निर्देश. मराठी पत्रकार परिषदेचे पदाधिकाऱ्यांसमवेतच्या बैठकीत निर्णय.
 • वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. अमित देशमुख वरळी येथील पोद्दार वैद्यकीय रुग्णालयाला भेट. पोद्दार वैद्यकीय महाविद्यालय, पोद्दार रुग्णालय आणि पोद्दार वसतिगृहातील पायाभूत सुविधांचा श्री.  देशमुख यांच्याकडून आढावा. वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रमात ‘स्पोर्टस मेडिसीन’ या विषयाचा समावेश करण्याची श्री. देशमुख यांचे निर्देश.
 • अल्पसंख्याक विकास मंत्री श्री. नवाब मलिक यांच्याद्वारे मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या कामकाजाचा आढावा. अल्पसंख्यांक तरुणांसाठी शिक्षण व रोजगार निर्मितीवर भर देण्याचे मंत्रीमहोदयांचे निर्देश.
 • शिर्डी बंद प्रकरणी मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांची यशस्वी मध्यस्थी ; पाथरीच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास हरकत नसल्याचा शिर्डी ग्रामस्थांचा निर्वाळा.
 • मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या दखलीमुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकरी श्री.धनाजी जाधव यांच्या शेतजमिनीच्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या सात बाऱ्यावरील नोंदी, जिल्हाप्रशासनाकडून अद्ययावत. यामुळे कर्ज परतफेडीसह शेतविषयक  इतर कामांचा मार्ग मोकळा.
 • पोलीस मुख्यालयात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या अर्धवार्षिक परिषदेमध्ये मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांचे मार्गदर्शन. महत्वाचे मुद्दे : संभाव्य गुन्ह्यांवर नियंत्रणासाठी पोलिसांनी गुन्हेगारांच्या तंत्राचा अभ्यास करा. दहशतवाद तसेच नक्षलवादी लढा देण्यासाठी आणखी तयारी करा. दहशतवादी कारवायांच्या संभाव्य आव्हानांचा सामना करायचा असल्यास, या संदर्भातील शिक्षण शालेय पातळीवरुन द्या. उपमुख्यमंत्री : श्री. अजित पवार -पोलिसांना जेव्हा वेगवान हालचालींची आवश्यकता असते तेव्हा  ‘शिवनेरी’ व इतर आरामगाड्यांचा प्रवास अनुज्ञेय करण्याचा विचार. पोलिसांच्या मुलांसाठी वसतिगृहे.गृहमंत्री : श्री. अनिल देशमुख – ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’चा वापर करा. महापे येथील ‘सायबर’ मुख्यालयाच्या कामाला गती द्या. अवैध सावकारीला आळा घाला. महिलांसाठी असलेल्या ‘होमड्रॉप स्किम’ सारख्या नावीन्यपूर्ण योजना लागू करा.
 • मुंबई पोलिसांसाठी आयोजित उमंग 2020 या कार्यक्रमाचे बांद्रा रेक्लमनेशन येथील वर्ल्ड जीओ सेंटर या सभागृहात आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे, गृह मंत्री श्री. अनिल देशमुख, पर्यावरण मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांची उपस्थिती. पोलिसांची हिंमत आणि शौर्याचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक.
 • मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्या मार्फत विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील,  सिंदेवाही तालुक्यातील   हुमन नदीवर प्रस्तावित प्रकल्पाच्या आढावा. बैठकीला जलसंपदा मंत्री श्री जयंत पाटील यांची उपस्थिती. धरणाखालील एक किलोमीटर रुंदीच्या कॉरिडॉरमधील 200 हेक्टर खाजगी जमीन संपादित करण्याच्या प्रस्ताव तसेच वन क्षेत्रातून जाणाऱ्या कालव्यामुळे  वन्यजीवांचे भ्रमणमार्ग  खंडित होऊ नये,  याकरिता कालव्याचे बांधकाम बंदिस्त पाईपलाईनद्वारे, करण्याबाबत चर्चा.
 • मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्या मार्फत, कृष्णा खोरे विकास महामंडळ अंतर्गत येणाऱ्या खानापूर तासगाव व आटपाडी तालुक्यातील टेंभू उपसा सिंचन प्रकल्पाच्या प्रकल्पाच्या आढावा. बैठकीला जलसंपदा मंत्री श्री जयंत पाटील यांची उपस्थिती. लाभापासून वंचित गावांचा टेंभू योजनेत, समावेश करण्याबाबत चर्चा.
 • नाशिक महानगरपालिका परिवहन विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी नगरविकासमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत बैठक. नाशिक महापालिकेने शहराच्या परिवहन सेवेचा निर्णय सखोल अभ्यास करुन घेण्याची, श्री भूजबळ यांची सूचना.
 • करोना व्हायरस : १७३९ जणांची तपासणी,महाराष्ट्रात एकही संशयीत रुग्ण नाही, दोन रुग्ण निरीक्षणाखाली. नागरिकांनी घाबरून जावू  नये,असे आरोग्यमंत्री श्री राजेश टोपे यांचे आवाहन.
 • ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेच्या माध्यमातून उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांदरम्यान सांस्कृतिक देवाण-घेवाण व्हावी या उद्देशाने मुंबईत आयोजित ‘उत्तर प्रदेश दिवस’ राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा.
 • ड्रोन, पॅराग्लायडर्स, रिमोट कंट्रोलमार्फत उडविण्यात येणारे अतिलघु (मायक्रोलाईट) विमाने आदींचा वापर दहशतवादी अथवा असामाजिक तत्वांकडून दुर्घटना घडविण्यासाठी होण्याची शक्यता असल्याने  बृहन्मुंबई हद्दीत दिनांक 22 फेब्रुवारीपर्यंत ड्रोनसारख्या उपकरणांच्या उड्डाणास बंदी.
 • कोकण विभागातील जिल्ह्यांच्या वार्षिक योजनेची (सर्वसाधरण) राज्यस्तरीय बैठक उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री श्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुंबई शहर जिल्ह्‌याचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या उपस्थितीत संपन्न. मुंबई शहर‍ जिल्ह्यासाठी असलेल्या 2020-21 च्या वार्षिक योजनेतील 104 कोटिंची निधीची मर्यादा 35 कोटी रुपयाने वाढविण्याची पालकमंत्र्यांनी केलेली मागणी मान्य झाल्याने आता शहरासाठी सर्वसाधारण योजनेसाठी 140 कोटी रुपयांचा निधी मिळणार. मुंबईतील उपकर प्राप्त इमारतीच्या दुरुस्तीतील एका इमारतीसाठी एकदाच खर्च करण्याची अट शिथिल करण्याची श्री. शेख यांची मागणी अर्थमंत्र्यांकडून मान्य.

दि. 21 जानेवारी 2020

 • मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाचे सादरीकरण. महत्चाचे मुद्दे : कौशल्य विकासविषयक अभ्यासक्रमांचे जिल्हानिहाय नियोजन करा.  संबंधित भागातील गरजा, उद्योग, लघुउद्योग, उत्पादनसाधने आदींची माहिती घेऊन त्या अनुषंगाने अभ्यासक्रमांची आखणी करा. या प्रकल्पांसाठी आवश्यक कुशल मनुष्यबळाची माहिती घेऊन तसे अभ्यासक्रम आखा. उद्योग विभागाशी समन्वय ठेवून विविध उद्योगांना लागणाऱ्या कुशल कारागिरांची माहिती घेऊन ती संबंधीत तरुणांपर्यंत पोहोचवा. तरुणांचा कौशल्य विकास करण्याबरोबरच त्यांना योग्य जागी नोकरी लागेल यासाठी नियोजन करा.
  कौशल्य विकास मंत्री श्री. नवाब मलिक : राज्यात कुशल रोजगार निर्माण करण्यात कौशल्य विकास विभागाचे मोठे योगदान. आयटीआयच्या माध्यमातून आतापर्यंत लाखो तरुणांना रोजगार मिळाला आहे. दीर्घ मुदतीच्या अभ्यासक्रमात राज्यात इलेक्ट्रिशियन, फिटर, फॅशन टेक्नॉलॉजी संबंधित जिल्ह्यातील उपलब्ध साधनसामुग्री, उद्योगांच्या बदलत्या गरजा, सेवा क्षेत्राची मागणी यानुसार नव्या अभ्यासक्रमांची आखणी करणार.
 • अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याद्वारे अन्न व औषध प्रशासनाच्या कामांचा आढावा. मंत्रिमहोदयांचे निर्देश : अन्न व औषध प्रयोगशाळांचे बळकटीकरण करा. अन्न प्रशासन विभाग आणि आरोग्य विभागाच्या प्रयोगशाळा या औषध प्रशासन विभागाच्या अखत्यारित करण्याच्या प्रस्तावावर चर्चा करा. हॉटेल व्यवसायिक, मॉल व इतर ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नियमित तपासणी करा.
 • महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा एकोणिसाव्या दीक्षांत समारंभ राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न. कार्यक्रमाला विद्यापीठाचे प्र-कुलपती तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमि़त देशमुख, पालकमंत्री  छगन भुजबळ उपस्थित.
 • बदलत्या हवामानास तोंड देऊन गाव सक्षम करण्याकरिता ‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी’ प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सहभागी गावातील सरपंचांना कृषी मंत्री श्री. दादाजी भुसे यांच्याद्वारे जाणीवजागृती करण्याचे आवाहन. चार हजार सरपचांना पत्र पाठवले.
 • आरोग्य राज्यमंत्री श्री.राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याद्वारे आरोग्य विभागाचा आढावा. ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा बळकट करण्याचे श्री. पाटील यांचे सूतोवाच.
 • युरोपमध्ये बुडापेस्ट (हंगेरी) येथे ‘बुडापेस्ट सर्कस फेस्टिवल २०२०’ मध्ये सहभागी सांताक्रुझ येथील साने गुरूजी आरोग्य मंदिर या संस्थेतील क्रीडापटूंनी मल्लखांब सादरीकरणात करून भारताला तिसरा क्रमांक मिळवून दिल्याबद्दल  क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री  कुमारी अदिती तटकरे यांच्याद्वारे अभिनंदन.
 • मुंबई शहर जिल्ह्याच्या सन 2020-2021 च्या जिल्हा वार्षिक योजनेच्या 124 कोटी 11 लाख रुपयांच्या प्रारुप आराखड्यास व नियतव्ययास वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री अस्लम रमजान अली शेख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी.
 • राज्यात कार्यरत विविध मंडळांच्या शाळांमधून मराठी विषय सक्तीचा करण्यासंदर्भातील कायदा येत्या अधिवेशनात मांडण्यात येणार असून या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी मराठी भाषा विभाग मंत्री श्री. सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक.
 • छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी शिवछत्रपती पुरस्कारांचे वितरण करणार असल्याचे, उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री श्री. अजित पवार यांची घोषणा. क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार, क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री अदिती तटकरे उपस्थित.

महत्वाचे मुद्दे : राज्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी अत्याधुनिक क्रीडा संकुल, खेळाडूंना देण्यात येणाऱ्या भोजनभत्ता, ट्रॅकसूट, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेदरम्यान होणाऱ्या प्रवासाला तसेच पायाभूत सुविधांसह खेळाचे साहित्य घेण्यासाठी मागील वर्षीपेक्षा यावर्षी अधिकची आर्थिक तरतूद. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनला देय असलेल्या रकमेचे तत्काळ वितरण करण्यात येईल.

क्रीडापटूंच्या 5 टक्के आरक्षणामध्ये शालेय स्पर्धा व राज्यक्रीडा संघटनांच्या स्पर्धांना एकच दर्जा. इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्र ऑलिम्पिक भवन निर्माण व्हावे यासाठी बालेवाडी येथील जागा उपलब्ध करुन यासाठी अनुदान देण्याचा प्रयत्न. राज्य क्रीडा संघटनांच्या खेळाडू प्रशिक्षण शिबीरासाठी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक.

 • भोर उपजिल्हा रुग्णालयाच्या विविध मागण्यांसंदर्भात आरोग्य मंत्री श्री. राजेश टोपे यांच्याद्वारे आढावा. मंत्रिमहोदयांचे निर्देश : रुग्णालयात तातडीने कान, नाक, घसा तज्ज्ञ उपलब्ध करुन द्या, रक्तपेढीमध्ये तंत्रज्ञाची नियुक्ती करा.
 • यावर्षी प्रजासत्ताकदिनी राजपथावर होणा-या पथसंचलनासाठी महाराष्ट्रातील 19 एनसीसी कॅडेट्सची  निवड.
 • मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे त्यांच्या उपस्थितीत पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या कामाचा आढावा.  मुख्यमंत्र्यांचे निर्देश : अनेक प्रादेशिक पाणीपुरवठा योजना देखभाल-दुरुस्ती अभावी बंद पडले आहेत त्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पाणीपुरवठा कार्यक्रम टप्पा-2 राबविण्याबाबतचा प्रस्ताव तत्काळ सादर करा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या कामात सुधारणा करण्याच्या दृष्टीने आवश्यक ते धोरणात्मक निर्णय घ्या. प्रत्येक घरात घरगुती नळ जोडणीद्वारे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी केंद्र शासनाने सुरु केलेल्या जल जीवन मिशन कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करा. पाणी पुरवठा क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी ठोक पाणीपुरवठ्याचे राज्यात एकसारखे दर निश्चित करण्याचे धोरण ठरवा. भूगर्भातील पाणी साठवण ठेवणाऱ्या जलधारांची निश्चिती करुन विविध जल पुनर्भरण योजना राबविण्यासाठी आणि पिण्याच्या पाण्याचे उद्‌भव पुनरुज्जीवित करण्यासाठी नवीन योजनांचा प्रस्ताव सादर करा. पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे उपस्थित.
 • भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विकासासाठी निर्गमित योजनांच्या अंमलबजावणी संदर्भात, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग आणि विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडून आढावा. मंत्रिमहोदयांचे निर्देश : धनगर समाजातील विद्यार्थी आणि विद्यार्थीनींसाठी प्रत्येक जिल्ह्यात दोन वसतीगृह सुरू  करा. १०० विद्यार्थ्यांची क्षमता असलेले वसतीगृह सुरू करण्यासाठी इमारती करार पद्धतीने घ्या.  नेट आणि जेईई यासारख्या पात्रता परिक्षांच्या पूर्वतयारीसाठी मार्गदर्शक केंद्रे सुरू करण्यासदंर्भात नामांकित  संस्थांना ५० विद्यार्थ्यांसाठी प्रायोगिक तत्वावर अनुदान देण्याची योजना सुरू करा. इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये सहायक आयुक्तांमार्फत तपासणी करा. धनगर समाजासाठी १० हजार घरे, घरकुल योजनेअंतर्गत बांधून द्या.
 • करोना व्हायरस : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 189 जणांची तपासणी. एकही संशयीत रुग्ण आढळला नसल्याचे आरोग्यमंत्र्यांची माहिती.
 • मुंबईच्या परळ  भागातील  झेन सदावर्ते आणि औरंगाबाद जिल्हयातील आकाश खिल्लारे यांना यंदाचा (वर्ष 2019)  राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर. या दोघांचेही उपमुख्यमंत्री श्री.अजित पवार यांच्याकडून अभिनंदन.
 • माहूल येथील प्रदुषणग्रस्त भागातील नागरिकांचे पुनर्वसन करण्याबाबत पर्यावरण मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारातून गृहनिर्माण मंत्री श्री. जितेंद्र आव्हाड यांच्याकडे बैठक. मंत्रिमहोदयांचे निर्देश : या पुनर्वसनासाठी सध्या उपलब्ध ३०० घरे म्हाडाने पुढील १० दिवसात मुंबई महापालिकेकडे हस्तांतरीत करा. मुंबई महापालिकेने या घरांमध्ये अतिप्रदुषीत भागातील कुटुंबांचे तातडीने पुनर्वसन करावे. उर्वरित कुटुंबाचे प्रधान्याने पुनर्वसन. माहुल येथील प्रदूषण नियंत्रित कसे करता येईल यावर चर्चा करण्यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाबरोबर लवकरच बैठक.
 •  वरळी बीडीडी चाळ येथील मागासवर्गीय मुलामुलींच्या वसतिगृहास तत्काळ चांगल्या सुविधा देण्याचे सामाजिक न्यायमंत्री श्री.धनंजय मुंडे यांचे निर्देश.
 • ‘ओबीसी’मधील दिव्यांग तसेच विधवा यांना हक्काचे घर देण्यासाठी रमाबाई आंबेडकर घरकुल योजनेच्या धर्तीवर नवीन योजना तयार करण्याचे इतर मागासवर्ग मंत्री श्री. विजय वडेट्टीवार यांचे अधिकाऱ्यांना निर्देश.
 • विमुक्त भटक्या जमातीतील वडार, रामोशी यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी यवतमाळ येथील वस्त्यांना भेट देणार असल्याची, माहिती विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांचा निर्णय.
 • राज्यपाल श्री.भगत सिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत शैक्षणिक विकास प्रशासन केंद्राच्या वतीने आयोजित उत्कृष्ट शिक्षक व उत्कृष्ट संस्था पुरस्कार प्रदान समारंभ संपन्न.
 • विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील जिगाव जलसिंचन प्रकल्पाची सद्यस्थिती व नियोजित कामांचा मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांच्याद्वारे आढावा. बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, जलसंपदा राज्यमंत्री श्री. बच्चू कडू उपस्थित.
 • मुंबई शहरामधील गृहनिर्माण प्रकल्पांसाठी पर्यावरण, गृहनिर्माण आणि महापालिकांकडून मिळणाऱ्या विविध परवानग्या गतीने मिळण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त, गृहनिर्माण सचिव आणि पर्यावरण सचिव यांची  समिती गठीत करण्याचा गृहनिर्माण मंत्री श्री. जितेंद्र आव्हाड आणि पर्यावरण मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांचा निर्णय. गृहनिर्माण प्रकल्पांना विविध मान्यता समांतरपणे मिळण्याच्या दृष्टीने ‘इज ऑफ डुइंग बिझनेस’च्या धोरणांतर्गत समितीची नियुक्ती.
 • इंदू मिल येथे होणाऱ्या, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित स्मारकाचे काम व आराखड्याची, सामाजिक न्याय मंत्री श्री. धनंजय मुंडे व खासदार श्री. शरद पवार यांच्याद्वारे पाहणी.
 • राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांत पहिली ते दहावीपर्यंत मराठी विषय शिकवणे सक्तीचे करण्याबाबत पुढील महिन्यात होत असलेल्या अधिवेशात कायदा करणार असल्याचे मराठी भाषा मंत्री श्री. सुभाष देसाई यांचे मुंबई मराठी पत्रकार संघाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या वार्तालाप कार्यक्रमात सूतोवाच. महत्वाचे मुद्दे : मागील सरकारच्या काळात सुरू करण्यात आलेले पुस्तकांचे गाव, रंगवैखरी आदी उपक्रम सुरू राहतील. महाविद्यालयीन तरुणांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी रंगवैखरी उपक्रम. मुंबई, पुण्यासोबतच नागपूर, औरंगाबाद, नाशिक, अमरावती येथे राबविणार. मराठी भाषेतून नस्तीवर अभिप्राय देण्याच्या सूचना. मराठीत टिपण्णी नसल्यास ती नस्ती स्वीकारली जाणार नाही.  मंत्रालयाबाहेरील शासकीय, निमशासकीय संस्थामध्ये मोठ्या प्रमाणात होत असलेल्या इंग्रजीच्या वापरावर पायबंद घालण्यासाठी प्रयत्न. रंगभवन येथेच मराठी भाषा भवन. ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा दूर करण्यासाठी छोटे सभागृह. महाराष्ट्राबाहेर राहून मराठी जतन करण्याचा जे प्रयत्न करतात, त्यांच्या प्रयत्नांना जोड देणारा उपक्रम. बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या सर्व घटकांचा मुंबईत मेळावा. मराठी मायबोलीची सेवा करणाऱ्यांचा उचित सन्मान. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी शासनाचे प्रयत्न.
 • माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव आणि महासंचालक म्हणून डॉ.दिलीप पांढरपट्टे (भा.प्र.से.) यांनी पदभार स्वीकारला.

दि. 22 जानेवारी 2020

मंत्रिमंडळ निर्णय :

 • कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीत पात्र शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्यासाठी 2017 मध्ये केलेली सुधारणा रद्द करून पूर्वीप्रमाणेच विविध कार्यकारी सेवा संस्थांमधून सदस्य निवड करण्यास व त्यादृष्टीने अध्यादेश प्रख्यापित करण्यास मान्यता.
 • नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांची निवड ही निर्वाचित नगरसेवकांमधून करण्यात येणार. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय.
 • ‘तान्हाजी – द अनसंग वॉरिअर’ चित्रपटाला राज्य वस्तू व सेवाकरात सवलत.
 • नाग नदी प्रदुषण रोखण्याच्या प्रकल्पासाठी आवश्यक निधीच्या कर्ज फेडीसाठी राज्य शासनाच्या हिश्श्याच्या रकमेस हमी देण्याचा निर्णय. प्रकल्पाच्या अंमलबजावणी आणि सनियंत्रणासाठी समन्वय समिती नियुक्त करण्यात येईल.
 • इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागासप्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष मागासप्रवर्ग कल्याण या प्रवर्गासाठी सह सचिव तसेच उप सचिव ही पदे निर्माण करण्यास मान्यता.
 • महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) अधिनियम, 2019 मधील कलम 2, कलम 7, कलम 10, कलम 13 व कलम 14 ते 20यातील तरतुदींची अंमलबजावणी  वस्तू व सेवा कर परिषद शिफारस करेल त्या दिनांकापासून करण्यासाठी  मान्यता.
 • मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे  यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई महापालिका निर्मित ‘वाईल्ड लाईफ मुंबई’ चित्रफीतीचा शुभारंभ व वीरमाता जिजाबाई उद्यानातील निसर्ग माहिती केंद्राचे सादरीकरण. वाईल्ड लाईफ मुंबई या चित्रफितीत मुंबईचा नैसर्गिक वारसा दाखवण्यात आला असून, आजच्या पिढीला तो प्रेरणादायी ठरेल असा श्री.ठाकरे यांचा विश्वास. या कार्यक्रमास राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित.
 • शालेय शिक्षण राज्यमंत्री श्री.बच्चू कडू यांच्याद्वारे विभागाचा आढावा. मंत्रिमहोदयांचे निर्देश : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करा. शिक्षकांची अ-ब-क अशी वर्गवारी करुन त्याचे परीक्षण वेळोवेळी करा. शालेय स्तरावर जातिनिहाय होणारे गणवेश वाटप बंद करा. जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना गणवेशांचे मोफत वाटप करा. अपंग समावेशित शिक्षण योजनेंतर्गत शिक्षक व परिचर यांचे समावेशन करा. ज्या शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असेल तर त्या संबंधित शिक्षकांवरती कारवाई करा.
 • भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे राज्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांमध्ये प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन, स्वातंत्र्य दिन या राष्ट्रीय दिनी सामूहिक वाचन होणार. येत्या २६ जानेवारीपासून राज्यात संविधानविषयक जनजागृतीसाठी हा उपक्रम सुरू करण्यात येत असल्याची, ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांची माहिती.
 • 26 जानेवारी रोजी सुरु होणारे ‘शिवभोजन’ हे गरीब व गरजू व्यक्तीसाठी आहे. यासाठी आधारकार्डची सक्ती करण्यात आलेली नाही. शिवभोजन केंद्रावर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य देऊन शिवभोजन योजनेचा लाभ देण्यात येईल, अशी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री श्री. छगन भुजबळ यांची माहिती.
 • राज्यात तालुकास्तरावर शेतकरी समन्वय समिती आणि कृषी विभागाच्या कार्यालयामध्ये शेतकरी सन्मान व मार्गदर्शन कक्ष स्थापन केला जाणार असल्याची, कृषीमंत्री दादाजी भुसे यांची माहिती.
 • रायगड जिल्ह्यातील  रोहा, गोरेगाव व तळा येथील सामाजिक सभागृहाचे बांधकाम तत्काळ सुरु करण्याचे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री श्री. धनंजय मुंडे यांचे निर्देश.
 •  मुंबई शहरात सफाई कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी 16 हजार घरे मुंबईत  उपलब्ध करुन देणार असल्याची सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री श्री. धनंजय मुंडे यांची माहिती.
 • भारतीय कृत्रिम दंतशास्त्र दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमास ऊर्जामंत्री डॉ.नितिन राऊत यांची उपस्थिती. कृत्रिम दंतशास्त्रामध्ये भरीव संशोधनाची गरज असल्याचे श्री.राऊत यांचे प्रतिपादन.
 • इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग विभागासाठी असलेल्या विविध योजना सक्षमपणे राबविण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात स्वतंत्र निधीची मागणी करण्याचे विभागाचे राज्यमंत्री श्री. बच्चू कडू यांचे निर्देश.
 • अन्नपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी विभागाने कठोर पावले उचलावी.  औषध निरीक्षकांची रिक्त पदे तातडीने भरावी, अशा सूचना अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश.
 •  राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या http://stateexcise.maharashtra.gov.in आणि  http://exerciseservices.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर सशुल्क मद्य सेवन परवाना उपलब्ध.
 • ‘स्टेमी’ (ST Elevation in Myocardial Infarction) या प्रकल्पाच्या माध्यमातून हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांना गोल्डन अवरमध्ये उपचार देण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात पुणे, नागपूर, औरंगाबाद, नांदेड, अकोला, नाशिक, ठाणे, रत्नागिरी, सोलापूर आणि वर्धा या 10 जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात राबविण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री श्री.राजेश टोपे यांची घोषणा.
 •  ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा परिषदांचे तलाव मासेमारीसाठी खुले करण्यास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सहमती दर्शविली असून त्यामुळे 5 लाखांहून अधिक रोजगार निर्मिती होऊ शकेल, अशी मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री श्री. दत्तात्रय भरणे यांची माहिती.
 •  दिव्यांग व दिव्यांगाच्या समस्या या विषयाकडे विशेष लक्ष देण्यासाठी दिव्यांग विकास विभाग स्वतंत्र करण्याबाबत सकारात्मक असल्याचे सामाजिक न्याय मंत्री श्री. धनंजय मुंडे यांची माहिती.
 • मत्स्यसाठ्यावर विपरीत परिणाम होऊ नये तसेच सर्वच स्तरातील मच्छीमारांचे हित लक्षात घेता मासेमारीसाठी एलईडीचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली असून यासंदर्भात यंत्रणांनी समन्वयाने कठोर कारवाई करण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री श्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश. परराज्यातील मच्छीमारांना राज्याच्या सागरी हद्दीत 12 नॉटिकल मैलांच्या आत येऊन मासेमारी करण्यास प्रतिबंध करा. मत्स्यव्यवसाय करणाऱ्या मच्छीमार बांधवांचेही नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होते. मच्छीमार बांधवाना नुकसान भरपाई मिळण्यासाठी मत्स्यव्यवसायाला शेतीचा दर्जा मिळणे आवश्यक असून त्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करण्याचे सुतोवाच. सर्व मच्छीमार बोटींना ए.आय.एस. (ऑटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम) तसेच व्हीटीएस (व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम) लावणार.
 • मुंबई विद्यापीठाची फोर्ट येथील इमारत व परिसराचे मूळ कलात्मक (हेरिटेज) सौंदर्य पूर्ववत जतन करुन तेथील निसर्गसंपदा वृद्धींगत करण्यात येणार असून त्यासाठी दोनशे कोटींचा निधी चार वर्षात टप्प्याटप्याने उपलब्ध करुन देण्याची उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांची घोषणा. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. उदय सामंत बैठकीस उपस्थित. मुंबई विद्यापीठ आण एमएमआरडीए यांच्या समन्वयातून यासंदर्भातील आराखडा तयार करणार. फोर्ट कॅम्पसप्रमाणे विद्यापीठाच्या कालिना येथील इमारतींची सौंदर्यवृद्धी, परिसराची स्वच्छता, वृक्षलागवड, अतिक्रमण निर्मूलन, शैक्षणिक सुविधांचा विकास आदींबाबत चर्चा.
 • 27 जानेवारीपासून प्रायोगिक तत्त्वावर ‘मुंबई 24 तास’ मंत्री श्री. अनिल देशमुख आणि श्री. आदित्य ठाकरे यांची माहिती.
 • “द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटन्ट्‌स ऑफ इंडिया’मार्फत घेण्यात आलेल्या चार्टर्ड अकाउंटन्ट्‌सच्या अंतिम परीक्षेत जुन्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेत मुंबईचा धवल चोप्रा देशातून तिसरा आल्या. त्याबद्दल उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार आणि उच्च व तंत्र शिक्षणमंत्री श्री. उदय सामंत यांच्याद्वारे सत्कार.
 • धनगर व तत्सम जातीतील महिलांच्या सहकारी संस्थाना शेळी गट वाटपाची योजना राबविण्यात येणार आहे. याच धर्तीवर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, इतर मागासवर्गीय, अल्पसंख्याक, एस.इ.बी.सी. आदी सर्वच मागासवर्गातील महिला सहकारी संस्थांना शेळी गटाचे वाटप योजना राबविण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे, पशुसंवर्धन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश.
 • बारामती फलटण – लोणंद या ६३ किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाच्या कामाला गती देण्याचे उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांचे निर्देश.
 • ‘समृद्ध पर्यावरण, रक्षण संकल्प’ या उपक्रमांतर्गत मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पर्यावरण मंत्री श्री.आदित्य ठाकरे यांच्यामार्फत पर्यावरण रक्षणाची शपथ कार्यक्रमाला सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, राज्यमंत्री संजय बनसोडे, अदिती तटकरे उपस्थित.
 • मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी जिल्हा वार्षिक योजना २०२०-२१ करिता एकूण ३७३.३५ कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता. बैठकीस उद्योग मंत्री सुभाष देसाई, अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक, परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख उपस्थित.

दि. 23 जानेवारी 2020

 • स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याद्वारे मंत्रालयात प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन.
 • खेलो इंडिया युथ गेम स्पर्धेत महाराष्ट्राचे अव्वल स्थान ; खेळाडूंना 78 सुवर्ण, 77 रौप्य आणि 101 कांस्य पदक अशी 256 पदके प्राप्त. खेलो इंडिया युथ गेम स्पर्धेत पदक तालिकेत महाराष्ट्राने अव्वल स्थान पटकाविल्याबद्दल मुख्यमंत्री श्री.उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री श्री अजित पवार आणि क्रीडा मंत्री श्री. सुनील केदार यांच्याद्वारे खेळाडूंचे अभिनंदन.
 • अलिबाग येथे कृषीमंत्री श्री.दादाजी भूसे यांच्या हस्ते शेतकरी सन्मान, मार्गदर्शक कक्ष सुरु राज्यात अशी 500 केंद्र सुरु करणार.
 • विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांच्या विविध मागण्यांसदर्भात शासन सकारात्मक असून लवकरच आढावा घेण्याचे आश्वासन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री.उदय सामंत यांनी महाराष्ट्र युनिव्हर्सिटीज ऑफिसर्स फोरमला दिले.
 • शिवभोजन योजनेसाठी तीन महिन्याकरिता ६.४८ कोटी रुपयांचे अनुदान,योजनेमध्ये थाळीची किंमत शहरी भागात प्रती थाळी ५० तर ग्रामीण भागामध्ये ३५ रुपये,योजना राबविण्यासाठी खानावळ, स्वंयसेवी संस्था, महिला बचतगट, भोजनालये, रेस्टॉरंट अथवा मेस यांची समितीमार्फत निवड, समितीचे अध्यक्ष –  महानगरपालिका आणि जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी, मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रात नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, तालुका- तहसिलदार, अध्यक्ष,राज्यस्तर- मुख्यसचिव. भोजनालये दुपारी १२ ते २ या वेळेत कार्यरत राहणार. एकाच वेळी किमान २५ व्यक्तींच्या जेवणासाठी बसण्याची व्यवस्था.  एका भोजनालयात किमान ७५ तर कमाल १५० थाळी भोजन उपलब्ध.
 • ‘मराठी भाषेच्या भल्यासाठी’ या संस्थेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक पद्‍मश्री मधु मंगेश कर्णिक, अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील, माजी संमेलनाध्यक्ष तथा कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, यांच्या सोबत, मराठी भाषा मंत्री श्री सुभाष देसाई यांची बैठक. मराठी भाषेचा विकास व संवर्धनासाठी साहित्यिकांनी केलेल्या सर्व सूचनांचा सन्मान केला जाईल, अशी श्री देसाई यांची ग्वाही.
 •  महाराष्ट्राच्या जडणघडणीत उल्लेखनीय कार्य करणारे ज्येष्ठ नेते डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी निमित्त विविध उपक्रम- डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या नावे जलसंपदा, जलसंधारण, पाणीपुरवठा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना जल भूषण पुरस्कार, नांदेड येथे विष्णुपुरी प्रकल्पांजवळ स्मारक, भोकर येथे पोलीस प्रशिक्षण केंद्र, नांदेड शहरात ग्रंथालय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, मुलामुलिंचे वसतीगृह.
 • ‘राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य आणि पोषण अभियान’ आणि ‘युनिसेफ’च्या विद्यमाने आयोजित पोषण अभियानसंदर्भातील राज्यस्तरीय परिषदेत महिला व बालविकास मंत्री श्रीमती यशोमती ठाकूर यांची उपस्थिती.  मंत्रीमहोदयांचे निर्देश – पुढील आर्थिक वर्षात अंगणवाड्यांच्या 4 हजार नवीन खोल्या बांधण्याचे नियोजन करण्यात आले असून या ठिकाणी पिण्याचे पाणी, शौचालय आदी पायाभूत सुविधा दर्जेदार उपलब्ध करुन द्या, सर्व अंगणवाड्या कार्यन्वित करा, शून्य ते 6 वयोगटातील लिंग गुणोत्तरात सुधारणा होण्याच्या दृष्टीने संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम  करा, गर्भधारणापूर्व आणि प्रसूतीपूर्व निदान तंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियमाची (पीसीपीएनडीटी) कठोर अंमलबजावणी करा, दोषसिद्धीचे प्रमाण वाढावे यासाठी योग्य पद्धतीने तपास करा, ‘टेक होम रेशन (टीएचआर)’ तसेच ‘हॉट कुक मील (एचसीएम)’ सुव्यवस्थितरीत्या पुरविण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पुरवठा व्यवस्थापनाकडे लक्ष द्या, आदिवासी भागातील तसेच दुर्गम भागात पोषण आहाराच्या व्यवस्थेकडे अधिक लक्ष द्या, तीव्र कुपोषित (मॅम) तसेच अतितीव्र कुपोषित (सॅम) बालके शोधून त्यांच्यावर तत्काळ उपचार करा, महिला व बालविकास विभागाच्या योजनांमध्ये ग्रामपंचायतींचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करा,शहरी भागामध्ये एकात्मिक बाल विकास प्रकल्पांचे पर्यवेक्षण अधिक चांगल्या प्रकारे होण्यासाठी कार्यप्रणाली तयार करा.
 • रयत शिक्षण संस्थेमार्फत पारंपरिक शिक्षण पद्धतीबरोबर कौशल्य आधारीत शिक्षण दिले जाते. संस्थेचे राज्यस्तरीय समूह विद्यापीठ (क्लस्टर युनिव्हर्सिटी) व्हावे, यासाठीचा प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर सादर करण्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री उदय सामंत यांचे निर्देश.
 • गोरेगाव येथील पत्रा चाळ पुनर्विकास प्रकल्पाची गृहनिर्माण मंत्री श्री.जितेंद्र आव्हाड यांची म्हाडातील अधिकाऱ्यांसमवेत पाहणी. पत्रा चाळींच्या पुनर्विकासाचा प्रकल्प लवकरच मार्गी लावून 672 रहिवाशांचे हक्काच्या घरात पुनर्वसनाची कार्यपध्दती ठरवण्यासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल येत्या 15 दिवसात सादर होणे अपेक्षित असल्याचे श्री. आव्हाड यांचे सुतोवाच.
 • शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार वितरणाचे नियोजन करण्यासाठी श्री. सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न.  क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे उपस्थित. दुर्लक्षित आणि ग्रामीण भागातील खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी त्या खेळांचा क्रीडा स्पर्धामध्ये समावेश करणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री श्री. सुनील केदार यांचे सुतोवाच.
 • ग्राम विकास मंत्री श्री. हसन मुश्रीम यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची परिषद संपन्न. महत्वाचे मुद्दे – ग्रामविकास विभागाच्या सध्या सुरु असलेल्या स्मार्ट ग्राम योजनेमध्ये सुधारणा करुन आर.आर.पाटील स्मार्ट ग्राम योजना राबवणार,  पुरस्काराच्या रकमेत वाढ करणार, तालुकास्तरावर चांगली कामगिरी करणाऱ्या गावांना १० लाख ऐवजी २० लाख रुपये, जिल्हास्तरावर चांगली कामगिरी करणाऱ्या गावांना ४० लाख ऐवजी ५० लाख रुपयांचा पुरस्कार देणार, पुढील पाच वर्षात गावांना जोडणारे सुमारे 36 हजार किमीचे रस्ते तयार करणार.
 • मुंबईत उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात २०१९-२० च्या साखर गाळप हंगामाकरिता कर्जपुरवठा उपलब्ध करणे तसेच आर्थिक समस्यांच्या निराकरणासाठी बैठक. महत्वाचे मुद्दे- साखर कारखान्यांना सॉफ्टलोन २०१९ अंतर्गत वितरीत कर्जपुरवठा तसेच शासन नियमानुसार बफरस्टॉकमध्ये गुंतलेली रक्कम या दोन्ही बाबी सेक्टोरल एक्सपोजरमधून वगळणे, सेक्टोरल एक्स्पोजरची मर्यादा वाढवणे. थकीत कर्जाच्या पुनर्गठनासंदर्भातील वस्तुस्थितीचा विचार करुन रिझर्व्ह बँक, नाबार्ड, राज्य सहकारी बँक तसेच साखर संघाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संयुक्त बैठक घेऊन मार्ग काढणे, साखर कारखान्यांना कर्जपुरवठा व कर्जमर्यादा वाढवणे तसेच कारखान्यातील शासनाचे भागभांडवल परतफेडीची मुदत  ५ ते ७ वर्षांनी वाढविणे.
 • उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयटीआयच्या उन्नती करणाबाबत बैठक. महत्वाचे मुद्दे- पुढील तीन वर्षात  ‘आयटीआय कौशल्य विकास’ कार्यक्रमांतर्गत सर्व ‘आयटीआय’ संस्थांचा चेहरा-मोहरा बदलणार,कौशल्यवृद्धीच्या कार्यक्रमात एव्हीएशन, थ्रीडी प्रिंटिंग, रोबोटीक वेल्डींग, डिझायन इंजिनियरिंग, ऑटो इलेक्ट्रीकल, कृषी अभियांत्रिकी आदी प्रशिक्षणाचा समावेश करणार.

  दि. 24 जानेवारी 2020

उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री  श्रीमती आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोकण विभाग जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2020-21 चीबैठक. महत्वाचे मुद्दे -रायगड जिल्ह्यासाठी 45 कोटी रुपयांची वाढ करून एकूण 234 कोटी रुपयांच्या प्रारूप आरखड्यास मान्यता, व्हिजन 2022 प्रमाणे आराखडा मांडणी, जिल्ह्यातील सर्व गावे/वाड्यांसाठी पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करून देण्यासाठी आराखडा. मत्स्यविकास योजना, 59 पर्यटन क्षेत्रात सोयी-सुविधा, सुशिक्षित बेरोजगारांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम, सर्व गावे/वाडी यामध्ये स्मशानभूमी शेड, गाव वाडी-वस्तीवर विद्युतीकरण, अँब्युलन्स स्पीड बोट, आठवी ते दहावीच्या विद्यार्थीनींसाठी सायकल वितरण, खाजगी जागेतील अंगणवाड्यांना  शासकीय जागा.

 • जलसंपदा मंत्री श्री. जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जलसंपदा विभागाचा आढावा. जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांची उपस्थिती. मंत्री महोदयांचे निर्देश :- प्रलंबित प्रकल्प पूर्ण करण्यासाठी विभागाने आवश्यक निधी, लागणारा कालावधी आणि प्रकल्पाची झालेली प्रगती यासंदर्भात सुयोग्य नियोजन करा, पुरामुळे  नुकसान होऊ नये याकरिता सतर्कतेचा इशारा (अलर्ट) देण्यासाठी यंत्रणा अद्ययावत करा, विभागाकडे असलेल्या मोठ्या प्रकल्पावर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी उत्तम अशा सुविधा देऊन जलपर्यटनाच्या नव्या योजना तयार करा.   प्रायोगिक तत्वावर जलव्यवस्थापन करुन घेण्यासाठी खासगी व्यक्ती वा संस्थांकडून काम करुन घेण्याबाबत योजना करा. राज्यमंत्री श्री बच्चू कडू- शालेय अभ्यासक्रम आणि  औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये जलसाक्षरता विषय सुरु करण्यासाठी प्रयत्न केले जातील.
 • बृहन्‍मुंबई  हद्दीतील नागरिकांनी  त्यांच्या घरात राहत असलेल्या भाडेकरुंची संपूर्ण माहिती जवळच्या पोलीस ठाण्‍यात देण्याचे बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाने निर्देश.
 • उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री श्री अजित पवार यांची पत्रकार परिषद. महत्वाचे मुद्दे- पर्यटनवृद्धी, पायाभूत सुविधा विकासावर भर असलेल्या कोकणातील जिल्ह्यांच्या विकास आराखड्यांना मंजुरी, मुंबई शहर व उपनगरासह कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांतील पर्यटन विकासाला प्राधान्य, रस्ते, शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, कौशल्य विकास, तंत्रशिक्षण आदी पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर भर, संबंधित जिल्ह्यांचा मानव विकास निर्देशांक, शहरी व ग्रामीण लोकसंख्या, क्षेत्रफळ आदी निश्चित निकषांच्या आधारे जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत निधी मंजूर, मुंबईसह ठाणे व कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये जागतिक वारसा लाभलेल्या वास्तू तसेच निसर्गसंपन्न पर्यटन स्थळांचा ‘हेरिटेज’ दर्जा कायम ठेवून पर्यटकांना आकर्षित करण्यावर भर,  मुंबई पोर्ट ट्रस्ट, एमएमआरडीए, मुंबई महानगरपालिका, राज्यशासन या व इतर संबंधित यंत्रणांचे सहकार्य व समन्वयातून कोकण विभागाच्या सर्वांगीण विकासाला गती, मुंबईतील नद्यांची स्वच्छता व किनाऱ्यांचे सुशोभीकरण, शहरात हेरिटेज वॉक, महिलांसाठी स्वच्छतागृहे, कायदा-सुव्यवस्था बिघडणार नाही, नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेऊन ‘मुंबई 24 तास’ उपक्रमाची अंमलबजावणी, गेटवे ते मांडवा स्पीडबोट सेवा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रमहर्षी बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मारक, विद्यार्थी वसतीगृहे, माळशेज घाट परिसरात निसर्ग न्याहळण्यासाठी ‘ग्लास ब्रीज’.
 • प्रजासत्ताकदिनी दिल्लीच्या राजपथावरील संचलनात सहभागी होण्याची संधी न मिळालेल्या होऊ “स्वराज्याचे सरखेल दर्यासारंग- कान्होजी आंग्रे” या विषयावरील  चित्ररथाचा प्रजासत्ताकदिनी 26 जानेवारी 2020 रोजी मुंबईतील शिवाजीपार्क येथील संचलनात सहभाग.
 • गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची पत्रकार परिषद. महत्वाचे मुद्दे- म्हाडामध्ये पोलीस कॉन्स्टेबल, चतुर्थ श्रेणी शासकीय कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येकी दहा टक्के सदनिका आरक्षित, म्हाडामध्ये एकही फाईल पंचेचाळीस दिवसांपेक्षा जास्त दिवस प्रलंबित राहणार नाही,गोरेगाव येथील पत्रा चाळीच्या संदर्भात दीड महिन्यात अंतिम निर्णय, झोपडपट्टी पुनर्वसन योजना जास्त काळ रखडलेली राहू नये यासाठी फॉरवर्ड ट्रेडिंग बंद करण्याचा विचार, गृहनिर्माण क्षेत्राला गती देण्यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यासमवेत स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयेाजन, घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगर मधील रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी नवीन योजना, मुंबई व ठाण्यातील सरकारी जमिनींपैकी काही जमिनी गृहप्रकल्पांसाठी आरक्षित करता येतील का याची चाचपणी, प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून लोकांना परवडणारी घरे घरांची उपलब्धता ,‘झोपु’ प्राधिकरण व म्हाडामध्ये अधिकारांचे विकेंद्रीकरण.
 • पुणे महानगर परिसराच्या विकासासाठी असलेले प्रकल्प वेळेत पूर्ण करावे. विकास प्रकल्पांची कामे करताना महापालिकेच्या समन्वयातून त्याची अंमलबजावणी करावी. शहराचे सौंदर्य देखील जपावे, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे केल्या.
 • मंत्रालयात मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री श्री.अजित पवार आणि नगरविकास मंत्री श्री.एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची बैठक. मुख्यमंत्र्यांचे निर्देश :- पुणे महानगर परिसराच्या विकासासाठी असलेले प्रकल्प वेळेत पूर्ण करा. विकास प्रकल्पांची कामे करताना महापालिकेच्या समन्वयातून अंमलबजावणी करा. शहराचे सौंदर्य जपा.
 • ‘राष्ट्रीय मतदार दिना’निमित्त लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची प्रतिज्ञा घेण्याचा कार्यक्रम मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात संपन्न.
 • अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री यांच्याद्वारे राज्यातील सर्व पुरवठा उपायुक्त, जिल्हाधिकारी आणि जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यासमवेत शिवभोजन योजनेच्या तयारीचा, व्हिडिओ कॉन्फन्सिंगद्वारे आढावा. मंत्रीमहोदयांचे निर्देश : शिवभोजन योजनेची जास्तीत जास्त गरीब व गरजू लोकांना माहिती होण्यासाठी होर्डिंग, बॅनर्स, पोस्टर्स, फ्लेक्स आणि माहिती फलक योग्य ठिकाणी लावा, शिवभोजन केंद्रात स्वतंत्र किचनची व्यवस्था करा, किचनमध्ये अन्न पदार्थ तयार करताना स्वच्छतेचे सर्व निकष पाळणे बंधनकारक करा, अन्नपदार्थ तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी भांडी स्टेन्लेस स्टीलची राहील याची खात्री करा, अन्नपदार्थ तयार करताना फिल्टर पाण्याचा वापर करा,स्वच्छ टेबल, पोषक पदार्थ आणि गुणवत्ता राखून भोजन तयार होईल, याकडे लक्ष पुरवा.
 • महाराष्ट्र कांदळवन आणि सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठानमार्फत शोभिवंत मत्स्यपालनाकरिता तीन दिवसांची कार्यशाळा संपन्न, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील ३७ ग्रामस्थांचा सहभाग.
 • ‘लोकशाही, निवडणुका व सुशासन’ याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने दि.26 जानेवारी ते 10 फेब्रुवारी या कालावधीत लोकशाही पंधरवड्यानिमित्त राज्य निवडणूक आयोगामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांची माहिती.
 • उपमुख्यमंत्री श्री.अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री.उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत कोकण विभाग जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण 2020-21 ची बैठक. महत्वाचे मुद्दे- सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 118 कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मंजूरी, मालवण नगरपरिषद येथे म्युझिकल फाऊंटन, देवगड नगरपंचायत येथे पर्यटन सुविधा, मालवण नगरपरिषद क्षेत्रात ओपन जीम, सायन्स सेंटर, एमपीएससी आणि यूपीएससी स्पर्धा परीक्षांकरिता क्लासरूम आणि वाचनालय, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये इ-लर्निंग सुविधा, मालवण वेंगुर्ला नगरपालिका क्षेत्रात बायोकंपोस्ट मशीन, अपारंपरिक ऊर्जा योजनेअंतर्गत कामे, आरोग्य, शिक्षण, सागरी मत्स्यव्यवसाय याकडे विशेष लक्ष.
 • ज्याचे आजपर्यंत एकही पुस्तक प्रकाशित झालेले नाही अशा नवलेखकांच्या पहिल्या पुस्तक प्रकाशनाच्या अनुदानासाठी, 28 फेब्रुवारी 2020 पर्यंत  अर्ज करण्याचे, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे आवाहन. संपर्क- सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्य मंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई 400025. दूरध्वनी : 022-24325931, संकेतस्थळ-  www.maharashtra.gov.in वरील पथ- नवीन संदेश-नवलेखक अनुदान योजना 2020- माहितीपत्रक व अर्ज – What’s New – Navlekhak Grant Scheme Rules Book and Application Form.  मंडळाचे संकेतस्थळ-  https://sahitya.marathi.gov.in

दि. 25 जानेवारी 2020

 • महाराष्ट्रातील 54 पोलिसांना उल्लेखनीय कामगीरीसाठी दिले जाणारे राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर. यामध्ये  10 पोलीस अधिकाऱ्यांना शौर्य पदक, 4 पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक तर 40 पोलिसांना गुणवत्ता सेवा पदक ,यांचा समावेश. महाराष्ट्रातील 5 व्यक्तींना जीवन रक्षा पदक आणि अग्निशमन सेवेमध्ये उल्लेखनीय कामगीरीसाठी महाराष्ट्रातील 7 अग्निशमन अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर. मुख्यमंत्र्यांडून सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन.
 • मंत्र्यांच्या खात्यात बदल – मंत्री श्री संजय राठोड यांच्याकडे असलेले आपत्ती व्यवस्थापन आणि मदत व पुनर्वसन खाते, मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे सुपूर्द. नवा बदल पुढील प्रमाणे- श्री विजय वडेट्टीवार – इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन.श्री संजय राठोड- वने, भूकंप पुनर्वसन.
 • पर्यावरण मंत्री श्री.आदित्य ठाकरे आणि राज्यमंत्री श्री.संजय बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत, पॅकिंगसाठी प्लास्टिकचा वापर करावा लागणाऱ्या विविध उत्पादनांच्या कंपन्यांसमवेत बैठक. वापर झालेल्या प्लास्टिकचे व्यवस्थापन, वापरलेले प्लास्टिक ग्राहकांकडून मिळविणे, त्यांचे रिसायकलींग करणे या विषयांवर चर्चा. कंपन्यांनी सुचवलेल्या उपाययोजनांसह फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात पुन्हा बैठक घेऊन प्लास्टिक व्यवस्थापनासंदर्भात ठोस उपाययोजना करण्याचे श्री.ठाकरे यांचे सूतोवाच.
 • करोना जंतुसंसर्ग आजाराच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि नगरविकास मंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक. मुख्यमंत्र्याचे निर्देश- नागरिकांना सतर्क करा, रुग्ण तपासणी व उपचाराबाबत जागतिक आरोग्य संघटना व केंद्रीय आरोग्य विभागाच्या सूचनांप्रमाणे कार्यवाही करा, करोना व्हायरस बाधीत प्रांतातून आलेल्या प्रवाशांची तपासणी झाल्यानंतर पुढील २८ दिवस त्यांचा दररोज पाठपुरावा करा, अशा प्रवाशांना सर्दी, ताप, खोकला अशा स्वरूपाची लक्षणे जाणवतात का, अशी विचारणा करा, वातावरणातील बदलांमुळे सामान्य स्वरूपाची सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे, करोना जंतुसंसर्ग झालेल्या रुग्णांतही आढळून येतात, त्यामुळे रुग्णांमध्ये फरक ओळखण्यासाठी मार्गदर्शक सूचना तयार करा, आवश्यकता भासल्यास खासगी लॅब, मुंबईतील खासगी रुग्णालयांची मदत घ्या, नागरिकांना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सजग करा, रुग्णालयांमध्ये मास्कचा वापर, स्वच्छता, पुरेसा औषधसाठा याबाबत दक्षता घ्या.तपासणीसाठी नमुन्यांची संख्या वाढली तरी त्यासाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने सज्ज रहावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
 • राज्यपाल श्री.भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत २६ व्या लॉयन गोल्ड पारितोषिक कार्यक्रम संपन्न.
Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here