महाराष्ट्रापेक्षा गुजरातमध्ये आधी राष्ट्रपती राजवट लागू करा

मुंबई – महाराष्ट्रापेक्षा गुजरातमधील करोनाची स्थिती अत्यंत भीषण आहे. त्यामुळे या कारणामुळे जर कोठे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणीच करायची असेल तर आधी गुजरातमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा, असा पलटवार शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. भाजपचे नेते नारायण राणे यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी काल राज्यपालांकडे केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी हे प्रतिपादन केले. तथापि, त्यांनी ही प्रतिक्रिया देताना राणे यांचे नाव घेणे टाळले.
राऊत म्हणाले की, करोनाची स्थिती गुजरात सरकारला प्रभावीपणे हाताळता आली नाही यावर उच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केले असून हायकोर्टाने गुजरात सरकारवर या संबंधात कडक ताशेरे मारले आहेत. त्यामुळे केंद्राने गुजरामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करून तेथून या प्रक्रियेला सुरुवात केली पाहिजे, असे ते म्हणाले. राज्यातील तीन पक्षांच्या आघाडीचे सरकार अत्यंत भक्कम असून ते स्थिर आहे, असा दावाही त्यांनी केला. विरोधकांनी आता क्वारंटाइन व्हावे, अशी उपरोधिक सूचनाही त्यांनी केली.
महाराष्ट्र सरकार अस्थिर करण्याचे त्यांचे प्रयत्न त्यांच्यावरच बुमरॅंग होऊ शकतील, असा इशाराही त्यांनी दिला. राज्य सरकार खाली खेचण्याचा फॉर्म्युला त्यांना अजून सापडायचा आहे, असेही ते म्हणाले. पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना काही सल्ला दिला आहे, त्या विषयी विचारले असता राऊत म्हणाले की, अगदी पंतप्रधान मोदीही पवारांचे सल्ले घेतात. त्यामुळे त्यांनी पवारांचे सल्ले घेण्यात काहीही चुकीचे नाही.
राज्यात राष्ट्रपती राजवटीची गरज नाही – मुनगंटीवार
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी भाजपचे नेते नारायण राणे यांनी केली असली तरी ती भाजपची अधिकृत भूमिका नाही, असा खुलासा ज्येष्ठ भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, राज्यातील स्थिती गंभीर असली तरी येथे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची गरज नाही. तथापि, राज्यातील सरकार करोनाच्या स्थितीवर गांभीर्याने उपाययोजना करीत नाही असे आमचे मत आहे, असेही त्यांनी आज काही दूरचित्रवाणीवाहिन्यांवर मुलाखत देताना सांगितले.





