वॉशिंग्टन, – अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात महाभियोगाची प्रक्रिया चालवण्याचा प्रयत्न घटनाबाह्य असल्याचे घोषित करण्याची मागणी रिपब्लिक पक्षाचे सदस्य रॅंड पॉल यांनी वरिष्ठ सभागृह सिनेटमध्ये केली होती. मात्र त्यांची ही मागणी फेटाळण्यात आली आहे. पॉल यांनी मंगळवारी सिनेटमध्ये याबाबतचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र त्यांचा हा प्रस्ताव 55-45 मतांनी फेटाळण्यात आला आहे.
माजी अध्यक्ष ट्रम्प हे पॉल यांच्या रिपब्लिक पक्षाचेच असून त्यांच्या समर्थकांनी 6 जानेवारी रोजी अमेरिकेच्या संसद परिसरात धुडगूस घातला होता. ट्रम्प यांच्या चिथावणीमुळेच हे सगळे घडले असा आरोप असून ट्रम्प यांच्यावर महाभियोगाची प्रक्रिया सुरू करण्याची मागणी तेव्हापासून सुरू झाली आहे. ट्रम्प यांना त्यांच्या पक्षातून काही जणांचे समर्थन मिळाले असले तरी पक्षांतर्गत विरोधाचाही त्यांना सामना करावा लागला आहे.
मात्र आता ट्रम्प पदावरून पायउतार झाले असल्यामुळे या सगळ्या प्रक्रियेचे संदर्भही बदलले आहेत. डेमोक्रॅटीक पक्षाने महाभियोगाची प्रक्रिया सुरू करण्याची मागणी केली होती. ही प्रक्रिया कनिष्ठ सभागृह असलेल्या प्रतिनीधी सभेतून सुरू केली जाते. त्यानंतर ती वरिष्ठ सभागृह अर्थात सिनेटमध्ये जाते. त्यानंतर ही दोन्ही सभागृहे कारवाईला अंतिम स्वरूप देतात.
प्रतिनिधी सभागृहात डेमोक्रेटीक पक्षाचे वर्चस्व असल्यामुळे तेथे महाभियोगाचा प्रस्ताव संमत करण्यात आला. दुसऱ्या टप्प्यात हा प्रस्ताव आता सिनेटमध्ये आला आहे. मात्र येते डेमोक्रॅटीक पक्षाकडे बहुमत नाही.
सध्याच्या स्थितीत सिनेटमध्ये दोन्ही पक्षांचे समान बलाबल आहे. ठरावाच्या बाजूने बहुमत प्राप्त करायचे असेल तर डेमोक्रॅटीक पक्षाला आणखी 17 सदस्यांचा म्हणजे रिपब्लिक पक्षाच्या 17 जणांचा पाठिंबा मिळवावा लागणार आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्यांना समर्थन मिळण्याची शक्यता सध्या तरी धुसरच असल्यामुळे ट्रम्प यांच्या विरोधातील ही प्रक्रिया बारगळण्याचीच शक्यता अधिक आहे.