सात लाख टन साखरेच्या निर्यातीवर परिणाम

नवी दिल्ली – भारतामध्ये गेल्या अनेक वर्षापासून गरजेपेक्षा जास्त साखर निर्माण होत आहे. निर्यात केल्यानंतर साखर कारखान्यांना थोडाफार आधार मिळतो. मात्र या वर्षी सात लाख टन साखरेच्या निर्यातीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
अफगाणिस्तानमध्ये अचानक सत्तांतर झाल्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला असल्याचे साखर उत्पादकांनी सांगितले. अफगाणिस्तान हा भारताच्या मुख्य 3 साखर आयातदारापैकी एक देश होता. त्या देशाकडून मोठ्या प्रमाणात साखरेच्या ऑर्डर आल्या होत्या. मात्र सत्तांतर झाल्यानंतर या आयातीच्या ऑर्डर अफगाणिस्तानातून रद्द करण्यात आल्या आहेत.
अफगाणिस्तान भारतातील साखरेच्या मोठ्या तीन आयातदार देशांपैकी एक देश आहे. सर्वसाधारणपणे भारत-अफगाणिस्तानला वर्षाला सात लाख टन साखर निर्यात करतो. मात्र तेथील नव्या व्यवस्थेने भारतीय साखरेवर बंदी घालण्याची भाषा अजून केलेली नाही. पाकिस्तानने भारतीय साखरेवर बंदी घातली आहे. अफगाणिस्तानमधील परिस्थिती लवकरच सुधारेल अशी आशा साखर उत्पादकांना आहे.





