अमेरिकेच्या शुल्काचा आशिया खंडावर परिणाम

नवी दिल्ली – अमेरिकेने जशास तसे आयात शुल्क लावण्याचा संकल्प केला आहे. लवकरच या संदर्भातील आकडेवारी बाहेर येईल. एकूण परिस्थितीचा विचार केल्यानंतर आशिया खंडातील अनेक देशावर अमेरिकेच्या या धोरणाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. एस अॅण्ड पी या संस्थेने जारी केलेल्या मूल्यांकनानुसार व्हिएतनाम, तैवान, थायलंड, दक्षिण कोरिया या देशाची अमेरिकेला मोठ्या प्रमाणात निर्यात होते. अमेरिकेने या देशावर आयात शुल्क लावल्यानंतर या देशावर त्याचा सर्वाधिक परिणाम होणार आहे.
आशिया खंडातील भारत आणि जपानचाही अमेरिकेबरोबर बराच व्यापार आहे. मात्र या दोन देशाचा अमेरिकेबरोबर सेवा क्षेत्राचा जास्त व्यापार आहे. अशा परिस्थितीत इतर देशाच्या तुलनेत भारत आणि जपानवर याचा कमी परिणाम होणार आहे. मात्र तरीही हे देश इतर देशाशी निर्यात वाढवून ही तूट भरून काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे या संस्थेने नमूद केले आहे. त्याचबरोबर जपान आणि भारत बर्याच प्रमाणात देशांतर्गत बाजारपेठेवर अवलंबून आहेत. तसा आधार इतर देशांना कमी आहे.
अमेरिकेने अगोदरच चीनमधून येणार्या आयातीवर दहा टक्के आयात शुल्क लावले आहे. तर पोलाद आणि अॅल्युमिनियमच्या आयातीवर 25 टक्के आयात शुल्क लावले आहे. पोलादावरील आयात शुल्काचा परिणाम भारतावर बराच झाला आहे. कारण भारत जवळजवळ एक लाख टन एवढे पोलाद आणि अॅल्युमिनियम अमेरिकेला निर्यात करतो.
अमेरिकेवरही परिणाम
दरम्यान अमेरिकेच्या व्यापार धोरणाचा अर्थ अमेरिकन कंपन्यांनाही सध्या लागत नाही. त्यामुळे अनेक अमेरिकन कंपन्यांनी अमेरिकेच्या व्यापार धोरणावर टीका केली आहे. आयात महाग झाल्यानंतर अमेरिकेतही महागाई वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे असे अमेरिकेतील अर्थतज्ज्ञांनी सांगितले आहे. मात्र अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपली भूमिका बदलण्यास तयार नसल्याचे एकूण वातावरण आहे.





