“अमेरिकेच्या आयात शुल्कवाढीचा परिणाम; सप्टेंबरमध्ये सेवा क्षेत्राच्या उत्पादकतेत किंचित घट”

नवी दिल्ली – अमेरिकेने वाढविलेले आयात शुल्क आणि इतर कारणांचा आता सेवा क्षेत्राच्या उत्पादकतेवर नकारात्मक परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. याच कारणामुळे मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची उत्पादकता कमी झाल्याची आकडेवारी जाहीर झाली होती.
एचएसबीसी या संस्थेने जारी केलेल्या माहितीनुसार सप्टेंबर महिन्यातील सेवा क्षेत्राची उत्पादकता नोंदणारा पर्चेसिंग मॅनेजर इंडेक्स 60.9 इतका भरला आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये हा निर्देशांक पंधरा वर्षाच्या उच्चांकी पातळीवर म्हणजे 62.9 इतका नोंदला गेला होता. असे असले तरी चिंतेचे अजिबात कारण नसल्याचे विश्लेषकाकडून सांगण्यात येते.
कारण हा निर्देशांक 50 अंकापेक्षा कमी असल्यानंतर या क्षेत्राची उत्पादकता कमी होत असल्याचे समजले जाते. मात्र हा निर्देशांक सध्या 50 अंकापेक्षा कितीतरी जास्त पातळीवर आहे. सेवा क्षेत्राच्या मूलभूत घडामोडीवर नकारात्मक परिणाम झालेला नाही. सप्टेंबर महिन्यामध्ये देशातील विविध शहरात पाऊस पडला.
जागतिक बाजारातून मागणी कमी आल्यामुळे अपवादात्मकरीत्या सप्टेंबर महिन्यात सेवा क्षेत्राचा निर्देशांक कमी झाला असल्याचे समजले जाते. जीएसटी दरात कपात केल्यामुळे 22 सप्टेंबरपासून विविध वस्तूंचे आणि सेवांची विक्री वाढण्यास मदत होत आहे. त्यामुळे ही तूट लवकरच भरून निघेल असे समजले जात आहे.
भारतातील महागाईचा दर कमी आहे. अशा परिस्थितीत या क्षेत्राला लागणार्या कच्च्या मालाच्या दरात वाढ झालेली नाही. भारत सरकार विविध देशांबरोबर मुक्त व्यापार करार करीत आहे. त्याची अंमलबजावणी वेगात करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे परदेशातून मागणी लवकरच पूर्वपदावर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.





