Jayshree Gadkar : ‘रामायण’मधील कौसल्या केली अजरामर…2008 मध्ये काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेत्रीचं योगदान विसरणं अशक्य
Jayshree Gadkar : त्यांनी जवळपास २५० हून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय करत आपल्या दमदार भूमिकांनी प्रेक्षकांची मने जिंकली.

Jayshree Gadkar : रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या पौराणिक मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं. या मालिकेतील कलाकारांना मोठी लोकप्रियता मिळाली.
या मालिकेत प्रभू राम, सीता, लक्ष्मण यांच्याइतकीच प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळालं ते माता कौसल्या यांच्या भूमिकेलाही. ही भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री जयश्री गडकर यांची आजही लोक त्याच नावाने आठवण काढतात.
रामायणपूर्वी जयश्री गडकर या मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्री होत्या. त्यांनी जवळपास २५० हून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय करत आपल्या दमदार भूमिकांनी प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांची प्रत्येक भूमिका महिला वर्गावर मोठा प्रभाव ठाकणारी ठरली. अभिनयासोबतच त्यांनी दिग्दर्शनातही आपली छाप सोडली.
‘या’ चित्रपटातून काम करण्याची मिळाली संधी (Jayshree Gadkar)
जयश्री गडकर (Jayshree Gadkar ) यांनी अगदी लहान वयात अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. सुरुवातीला त्या तमाशा नृत्यांगना म्हणून काम करत होत्या. त्यानंतर दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या ‘झनक झनक पायल बाजे’ (१९५५) या चित्रपटातून त्यांना चित्रपटसृष्टीत काम करण्याची संधी मिळाली. जरी ती छोटी भूमिका होती, तरी त्यांच्या नृत्यकौशल्याने सर्वांचे लक्ष वेधले. यानंतर ‘सांगते ऐका’ या मराठी चित्रपटाने त्यांच्या कारकिर्दीला करिअरला कलाटणी दिली. या चित्रपटातून त्या मुख्य अभिनेत्री म्हणून झळकल्या आणि त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलेच नाही. मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी आपल्या अभिनयाची वेगळी ओळख निर्माण केली.
बाळ धुरी हे जयश्री गडकर यांच्या खऱ्या आयुष्यातील पती (Jayshree Gadkar)
रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेत त्यांनी साकारलेली माता कौसल्या ही भूमिका त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात संस्मरणीय ठरली. या भूमिकेतील त्यांचा संयमी, प्रेमळ आणि मातृत्वाने भरलेला अभिनय प्रेक्षकांच्या मनात कायमचा कोरला गेला. या मालिकेशी संबंधित आणखी एक विशेष बाब म्हणजे, राजा दशरथ यांची भूमिका साकारणारे अभिनेते बाळ धुरी हे जयश्री गडकर यांच्या खऱ्या आयुष्यातील पती होते. पडद्यावरही या दोघांच्या अभिनयाला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. दोघांची अॅानस्क्रिन केमेस्ट्री प्रेक्षकांना भुरळ पाडणारी ठरली.
‘रामायण’मधील कौशल्या अजरामर (Jayshree Gadkar)
जयश्री गडकर यांच मराठी चित्रपटसृष्टीतील योगदान अतुलनीय आहे. त्यांचा शेवटचा मराठी चित्रपट ‘चिमणी पाखरं’, तर हिंदीतील शेवटचा चित्रपट ‘लव कुश’ होता. २००० नंतर त्यांनी अभिनयातून निवृत्ती घेतली. २९ ऑगस्ट २००८ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मात्र, मराठी चित्रपटसृष्टीतील त्यांचे योगदान आणि ‘रामायण’मधील कौसल्या ही त्यांची अजरामर भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात तितकीच जिवंत आहे.





