लोकसभेत इमिग्रेशन बिल मंजूर: गृहमंत्री अमित शाह म्हणाले -“भारत ही कोणती धर्मशाळा नाही”

Immigration Bill passed in Lok Sabha – लोकसभेत बहुचर्चित इमिग्रेशन बिल अखेर मंजूर झाले आहे. या विधेयकामुळे रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांच्या अवैध प्रवेशाला आळा बसेल, असा विश्वास भाजपने व्यक्त केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले की, “भारत ही कोणती धर्मशाला नाही!”
अमित शाह म्हणाले, “बांगलादेशी घुसखोर असोत की रोहिंग्या, पूर्वी काँग्रेसच्या राजवटीत ते आसाममार्गे भारतात येत होते. आता ते पश्चिम बंगालमार्गे येतात, जिथे टीएमसी सत्तेत आहे. त्यांना आधार कार्ड, नागरिकता कोण पुरवतं? पकडलेल्या प्रत्येक बांगलादेशीकडे २४ परगणा जिल्ह्याचे आधार कार्ड आढळते. तुम्ही (टीएमसी) आधार कार्ड देता आणि ते मतदार कार्ड घेऊन दिल्लीत पोहोचतात. २०२६ मध्ये पश्चिम बंगालात भाजपाची सत्ता आली की, आम्ही यावर चाप लावू!”
शाह पुढे म्हणाले, “बांगलादेश सीमेलगत २२१६ किलोमीटर लांबीची आमची सीमा आहे, त्यापैकी १६५३ किलोमीटरचे कुंपण पूर्ण झाले आहे. ४५० किलोमीटरचे काम प्रलंबित आहे, कारण पश्चिम बंगाल सरकार जमीन देत नाही. जिथे कुंपणाचे काम सुरू होते, तिथे सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते गुंडगिरी करतात आणि धार्मिक घोषणा देतात.”
इमिग्रेशन बिल म्हणजे काय?
या विधेयकानुसार, वैध पासपोर्ट किंवा कागदपत्रांशिवाय कोणत्याही विदेशी नागरिकाला भारतात प्रवेश मिळणार नाही. असे कृत्य केल्यास ५ वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि ५ लाखांपर्यंत दंड आकारला जाईल. जर कोणी खोटी माहिती दिली किंवा कागदपत्रांमध्ये फेरफार केला, तर त्याला ३ वर्षांपर्यंतची शिक्षा आणि ३ लाखांचा दंड ठोठावला जाईल. वैध पासपोर्टशिवाय प्रवेश करणाऱ्याला तात्काळ ताब्यात घेतले जाईल आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित प्रकरणात कठोर कारवाई होईल.





