पिंपरी : मंडळांच्या मंडपातच विसर्जन

आज बाप्पाला निरोप : संकलन केंद्रात मूर्ती जमा कराव्यात
पिंपरी – शहरामध्ये करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यंदा नदीपात्रात व सार्वजनिक घाटांवर गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यास प्रतिबंध केला आहे. यामुळे बहुतेक गणेशोत्सव मंडळे आपल्या मंडळातच विसर्जन करणार आहेत. भोसरी परिसरातील गणरायांचे सोमवारी विसर्जन झाले. बहुतेक मंडळांनी मंडपातच तयार करण्यात आलेल्या हौदातच विसर्जन केले. तर काहींनी मूर्तीदान केल्या. अनंत चतुर्दशीच्या दिवशी मंगळवारी (दि. 1) नागरिकांनी गणेश मूर्तीचे विसर्जन घरामध्येच करून गणेशमूर्ती संकलन केंद्रात द्याव्या, असे आवाहन करण्यात आले आहे.
महापालिकेकडून विविध ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रांची व्यवस्था केली आहे. त्याशिवाय, विविध गणेश मंडळ आणि नगरसेवकांनी मूर्ती संकलनासाठी आवश्यक व्यवस्था केली आहे. बहुतांश गणेश मंडळांकडून गणेशमूर्तींचे मंडपात विसर्जन केले जाणार आहे. यंदा मिरवणूक काढण्यास परवानगी नसल्याने अतिशय साधेपणाने गणेश विसर्जन होईल.
गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक दरवर्षी मोठ्या थाटात केली जात होती. चिंचवड आणि पिंपरी येथून ही मिरवणूक निघत असे. चिंचवडमध्ये थेरगाव घाट येथे तर, पिंपरी-रिव्हर रस्ता मार्गे झुलेलाल घाटावर गणेशमूर्तींचे विसर्जन केले जात असे. त्याशिवाय, पिंपरी गावातील घाटावरही बऱ्याच गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याचे नियोजन असे. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा अतिशय साधेपणाने गणेशोत्सव झाला. त्याशिवाय, मिरवणुका काढण्यास बंदी आहे. त्यामुळे प्रभागनिहाय विविध ठिकाणांवर विसर्जनाची व्यवस्था केली आहे.
शहरातील बहुतांश गणेश मंडळांकडून मंडपातच सोडीयम बायकार्बोनेट पावडरचा वापर करून गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे. मोजके कार्यकर्ते त्यासाठी उपस्थित राहणार आहेत. त्याशिवाय, काही मंडळांनी घरगुती गणपती विसर्जनासाठी देखील मंडपांमध्ये आवश्यक व्यवस्था केलेली आहे.
मूर्ती संकलन केंद्र
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील सर्व प्रमुख चौकांमध्ये गणेशमूर्ती संकलन रथांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने सर्वसामान्य नागरिकांसाठी देखील काही गणेशोत्सव मंडळांमध्ये मूर्तीदान आणि मूर्ती विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
मंडळाच्या गणेशमूर्तीचे मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मंडपातच विसर्जन केले जाणार आहे. त्यासाठी आवश्यक व्यवस्था आम्ही केलेली आहे.
– राजाभाऊ गोलांडे, गांधी पेठ तालीम मित्र मंडळ, चिंचवडगाव.
मंडळाच्या शाडू मातीच्या गणेशमूर्तीचे अमोनियम बायकार्बोनेट पावडरचा वापर करून मंडपातच विसर्जन केले जाणार आहे. गणरायाची आरती करून त्यानंतर विसर्जन होईल.
– संजोग वाघेरे, अध्यक्ष, अमरदीप तरुण मंडळ, पिंपरी.





