Iltija Mufti : शहीदांच्या अवमानाबद्दल इल्तिजा मुफ्ती आक्रमक

श्रीनगर : इतिहासात काश्मीरमध्ये १३ जुलै १९३१ रोजी संघर्ष सुरु झाला होता. देशाच्या इतर भागांप्रमाणेच जम्मू-काश्मीरच्या लोकांनी लोकशाही आदर्शांसाठी बलिदान दिले, फरक एवढाच होता की त्यांचा संघर्ष स्थानिक शासकांविरुद्ध होता. त्यामुळे या शहिदांबद्दल कोणतेही आपत्तीकारक विधान खपवून घेतले जाणार नाही. ज्या भाजपा नेत्याने असे विधान केले आहे, अशा नेत्याने जाहीर माफी मागावी, असे प्रतिपादन पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या नेत्या इल्तिजा मुफ्ती यांनी केले आहे.
गुरुवारी विधानसभेत १३ जुलै १९३१ रोजी झालेल्या शहीदांबद्दल भाजप नेते सुनील शर्मा यांनी म्हटले होते की, त्या आंदोलनात मरण पावलेले नेते हे देशासाठी झालेले शहीद नव्हते. इल्तिजा मुफ्ती यांच्या नेतृत्वाखाली हा निषेध मोर्चा पोलो व्ह्यू श्रीनगर येथे संपला. यावर इल्तिजा मुफ्ती म्हणाल्या की, जम्मू-काश्मीरच्या लोकशाहीच्या लढाईची सुरुवात याच संघर्षाने झाली होती. भाजप फुटीरतावादी अजेंड्यासह इतिहास हाताळण्याचा प्रयत्न करत आहे.
जर भाजपा नेते खरोखरच महाराजा हरि सिंह यांचा आदर करत असतील, तर त्यांनी जम्मू-काश्मीरचा राज्य ध्वज, त्याची घटना आणि विलिनीकरणाच्या वेळी त्यांनी दिलेला विशेष दर्जा का रद्द केला? भाजपच्या नेतृत्वाखालील प्रशासन जम्मू-काश्मीरचा ऐतिहासिक वारसा नष्ट करत आहे. आम्ही १३ जुलै हा दिवस सार्वजनिक सुट्टीचा दिवस पुन्हा सुरू करण्याची मागणी करतो आहोत.





