पिंपरी | दीड लाखांचा अवैध दारूसाठा जप्त

वडगाव मावळ, (प्रतिनिधी) – लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे रविवारी (दि.१२) गावठी दारूची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करत एक लाख ४८ हजार रुपयांचा मुद्दमाल जप्त केला. तसेच इतर ठिकाणीही कारवाई कली आहे.
खेड तालुक्यातील वसुली येथील हॉटेल राजदरबार आणि हॉटेल सानिकावर कारवाई करून ४ हजार ८५५ रुपयांचे मद्य जप्त केले आहे. मावळ तालुक्यातील शिरगाव गावच्या हद्दीत चारचाकी वाहन (एमएच-१४-एई-३०६५) हातभट्टी दारूची वाहतूक करताना मिळून आले. या वाहनातून २८० लिटर गावठी मद्य जप्त करण्यात आले.
तसेच वाहतूक करण्यासाठी वापरलेले वाहन असा एकूण १ लाख ४८ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाहन चालक निलेश ज्ञानेश्वर पवार (वय ३५, रा. गोडूंब्रे, ता. मावळ) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. खेड तालुक्यातील वासुली गावच्या हद्दीतील हॉटेल राजदरबारमध्ये अवैधरित्या विक्रीसाठी आणलेले ४ हजार ८५५ रुपयांचे अवैध देशी-विदेशी मद्य मिळून आले.
याप्रकरणी राजेश दगडोबा घोनशेठवाड (वय ४२, रा. वासुली, ता. खेड) याला अटक केली आहे. वरील दोन्ही गुन्ह्यात मिळून एकूण एक लाख ५३ हजार ६५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरिक्षक संजय सराफ, पुणे. प्रवीण गाडगे, प्रशांत रुईकर, रवी लोखंडे, शिवाजी गळवे, रसूल काद्री, अविनाश दिघे, प्रदीप गवळी, अमोल अन्नदाते या पथकाने केली.





