illegal fish trade | शासनाने बंदी घातलेला मासा इंदापूरात खुलेआम! ; कारवाईत राजकीय हस्तक्षेप?

प्रभात वृत्तसेवा
इंदापूर – इंदापूर तालुक्यातील कालठण नं. 1 येथे मानवी आरोग्यास अपायकारक असलेल्या व शासनाने बंदी घातलेल्या मांगुर माश्याची बेकायदेशीर वाहतुक केल्याप्रकरणी अक्षय राजेंद्र पाडुळे यांच्यावर इंदापूर पोलिसांनी व मत्स्य व्यवसाय विकास विभागाच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाई मध्ये मिळून आलेल्या 1 हजार 500 किलो मांगूर मासा शास्त्रीय पद्धतीने नष्ट करण्यात आला.याबाबत हडपसर मत्स्यबीज केंद्राचे सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी राजेंद्र रूपचंद राठोड यांनी त्याच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे.
सोमवारी (दि. 22) रात्री पोलीस आपत्कालीन क्रमांक 112वर कालठण नं. 1 येथील अक्षय राजेंद्र पाडूळे हा त्याचे घरासमोर रस्त्या वर दोन पुरुष व एक महिला मांगूर माशाची तस्करी करत असल्याचा कॉल आला. या कॉलची दखल घेऊन इंदापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे नंदू जाधव व वाहन चालक गिरी हे कालठण नं. 1 मध्ये गेले. त्यावेळी तेथील काळभैरवनाथ मंदिराजवळ अक्षय पाडुळे हा विना क्रमांकाच्या हिरव्या रंगाच्या जॉन डिअर कंपनीच्या ट्रॅक्टरला जोडलेल्या ट्रॉलीमध्ये राष्ट्रीय हरित लवाद, नवी दिल्ली यांनी प्रतिबंधीत केलेल्या मांगुर जातीच्या माश्यांची बेकायदेशीर पणे वाहतूक करत असताना त्यांना आढळून आला.
हडपसरचे मत्स्यबीज व्यवसाय केंद्र व इंदापूर पोलीस ठाण्याकडून त्याला या आधी ही बेकायदेशीर मांगूर मत्स्यपालन करू नये. असे लेखी पत्राद्वारे कळवून देखील शासकीय आदेशाचा भंग करुन त्याने पर्यावरणास घोका निर्माण केला. हे मासे खाण्याने लोकांना गंभीर आजार होणार असल्याची जाणीव असताना हा प्रकार त्याने सुरुच ठेवल्याच्या कारणावरुन पाडुळे याच्यावर भा. न्या. सं. कलम 223 सह अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, 2006 चे कलम 59 व पर्यावरण (संरक्षण) अधिनियम 1986 चे कलम 3, 5 व 15 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार सचिन बोराडे अधिक तपास करत आहेत.
मत्स्य पालनासाठी राजकीय वरदहस्त
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सर्व मांगूर माशांची नगरपरिषदेच्या कचरा डेपोत खड्डा घेऊन विल्हेवाट लावण्यात आली आहे. उजनी धरण पाणलोट क्षेत्रात भीमा नदी काठी भिगवण ते कांदलगाव परिसरात प्रतिबंधित मांगूर माश्याचे पालन करून तिथे पंकज मासे पालन केले जात असल्याचे या परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र मत्स्य पालनासाठी त्यांना राजकीय वरदहस्त मिळत असल्याने, यामध्ये अनेक अर्थपूर्ण घडामोडी होत असल्याचे उघड गुपित आहे. त्यामुळे फक्त पाडुळे वरच का कारवाई, मोठे मासे कधी गळाला लागणार अशी चर्चा आहे.

