आळंदीत सामाजिक सलोखा; पोलिसांकडून इफ्तार पार्टीचे आयोजन

आळंदी – सध्या मुस्लीम समाजाचा रमजान महिना सुरू आहे. त्यानिमित्त सामाजिक सलोखा राखण्यासाठी आळंदी पोलिसांकडून सर्वधर्मीय इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. राज्यात एकीकडे भोंग्यांचे राजकारण सुरु असताना आणि सामाजिक वातावरण गढूळ झालेले असतानाही तीर्थक्षेत्र आळंदीत मात्र सामाजिक संदेश देण्यात आला. यावेळी इफ्तार पार्टीसाठी येथील मुस्लिम बांधव, शांतता कमिटी सदस्य, तसेच सर्व धर्म, सर्व पक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.
आळंदी येथे दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, हनुमान जयंती व ईद-ए-मिलाद असे सण मोठ्या उत्साहात सर्वांच्या सहभागातून साजरे केले जातात. या भागात एकता आणि बंधुता राखून सगळ्याच कार्यक्रमांचे आयोजन मोठ्या थाटात केले जाते. आणि विशेष म्हणजे सर्व जण एकमेकांच्या कार्यक्रमात हिरिरीने सहभागी होतात. त्याच अनुषंगाने शनिवारी सायंकाळी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. राज्यात सुरू असलेल्या राजकीय आणि सामाजिक वादाकडे दुर्लक्ष करत या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सर्वांनी आपापसात समन्वय ठेऊन शहरातील कायदा व सुव्यवस्था आणि बंधुता कायम ठेवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे, असा संदेशही या कार्यक्रमातून देण्यात आला.
यावेळी आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, पोलीस नाईक मच्छिंद्र शेंडे, माजी नगरसेवक डी.डी.भोसले, प्रकाश कुऱ्हाडे, पत्रकार महादेव पाखरे, श्रीधर कुऱ्हाडे, आळंदी जनहित फाउंडेशनचे अर्जुन मेदनकर, दक्षता समितीचे अध्यक्ष किरण नरके, संदीप रंधवे, महंमद हकीम, हमीद शेख, ज्ञानेश्वर घुंडरे, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, सुलतान शेख, नाजीम शेख, बाळासाहेब चौधरी, आरिफ शेख, उत्तम गोगावले, सतीशबापू कुऱ्हाडे, प्रसाद बोराटे, भाऊसाहेब कोळेकर, आळंदी पोलिस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी यांचेसह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी मान्यवरांसह पंचक्रोशीतील मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी इफ्तार पार्टीत विविध खाद्यपदार्थ तसेच फलाहार चा आस्वाद उपस्थितांनी घेतला. ही मेजवानी आळंदी पोलीस ठाण्याचे वतीने उत्साहात देण्यात आली. दरम्यान, सिद्धार्थ ग्रुप आळंदी देवाची यांच्या वतीनेदेखील ईफ्तर पार्टीचे नियोजन करण्यात आले होते. यावेळीही आळंदीतील सर्व धर्मीयांनी उपस्थिती दर्शवली.









