निवृत्तीनंतर नेहमीसाठी सकारात्मकता हवी असल्यास ‘हे’ काम नक्की करा ; आरोग्यातही होते प्रचंड सुधारणा

वॉशिंग्टन : दीर्घकाळ नोकरी करून निवृत्त झाल्यावर वेळ कसा घालवायचा याबाबत ज्येष्ठ नागरिकांना नेहमीच चिंता वाटत असते. आता एका नवीन संशोधनाप्रमाणे निवृत्त ज्येष्ठ नागरिकांनी जर समाजसेवेमध्ये आणि स्वयंसेवेमध्ये काळ व्यक्तीत केला तर त्यांच्या आरोग्यातही सुधारणा होते आणि त्यांच्या आयुष्यात सकारत्मकताही निर्माण होते.
जागतिक स्तरावर काम करणाऱ्या अलझायमर असोसिएशनचे एक संमेलन नुकतेच एम्स्टरडॅम येथे पार पडले त्या संमेलनामध्ये सादर करण्यात आलेल्या एका संशोधन अहवालामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. समाजसेवा करणाऱ्या वृद्धांची स्मृती सुद्धा चांगली राहते आणि आगामी कालावधीमध्ये त्यांना विस्मरणासारखे आजार जडत नाहीत असे या अहवालात म्हटले आहे.
अल्झायमर असोसिएशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मारिया कॅरीलो यांनी दिलेला माहितीप्रमाणे समाजसेवेत गुंतलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा आयुष्यावर योग्य फोकस होतो. ते योग्य प्रकारे विचार करायला लागतात त्यांच्या मनात कोणतेही नकारात्मक विचार येत नाहीत अजूनही आपण उपयुक्त आहोत. ही भावना त्यांच्या मनात सकारात्मकता निर्माण करते.
सर्वसाधारणपणे निवृत्तीनंतर ज्येष्ठ नागरिकांना डिप्रेशन निद्रानाश विस्मरणअसे अनेक विकार जडत असतात, पण कोणत्या ना कोणत्या कारणाने एखाद्या सामाजिक संस्थेशी संबंध ठेवून ज्येष्ठ नागरिकांनी समाजसेवेमध्ये भाग घेतला तर ते या आजारापासून दूर राहू शकतात, असेही या अहवालात म्हटले आहे. अशा प्रकारची समाजसेवा करत असताना ज्येष्ठ नागरिक समाजात मिसळत असतात. नवनवीन ओळखी निर्माण होत असतात, त्याचा सकारात्मक परिणाम त्यांच्या मनावर होतो आणि त्यांच्या आरोग्यात सुधारणा होते असेही या अहवालात म्हटले आहे.





