खत हवं असेल तर जात सांगा हा प्रकार सांगलीपुरता मर्यादित असेल – जयंतराव पाटील

मुंबई – अर्थमंत्र्यांनी आज १६ हजार कोटी रुपयांच्या तुटीचा अर्थसंकल्प मांडला, परंतु ज्या घोषणा केल्या त्या किमान लाखभर कोटींच्या असल्याने त्याची बेरीज केली तर ही तूट १६ हजार कोटींवरुन एक लाख कोटीवर देखील जाऊ शकते. अशा स्वप्नाळू अर्थसंकल्पाचे आज दर्शन झाले, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अर्थसंकल्पावर बोलताना शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली.
जयंत पाटील पुढे म्हणाले, “खत हवं असेल तर जात सांगा हा प्रकार सांगलीपुरता मर्यादित असेल’ असं मला वाटत नाही. हा प्रकार संपूर्ण महाराष्ट्रात आणि कदाचित देशातही असेल. अशाप्रकारे शेतकऱ्याला त्याची जात विचारून मग खत देणे हे अतिशय धक्कादायक आहे. याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे.” असेही ते म्हणाले आहे.
आर्थिक पाहणी अहवालात आपल्या राज्याचे उत्पन्न, विकासदर हा मागच्या आठ महिन्यात कमी झालेला आहे. चालू अर्थसंकल्पातदेखील सरकार वेळेवर पैसे खर्च करत नाही. असे असताना सरकारने आज मोठ्या घोषणा केल्या व या करताना सर्व क्षेत्रांना खूश करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये आविर्भाव असा होता की, या महाराष्ट्रातील सर्व घटकांना न्याय द्यायचा. तो न्याय वर्षभर करायचा असतो परंतु तो वर्षभराचा वेळ आपल्याला मिळणार नाही याची खात्री मनात ठेवून हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला असल्याचा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.




