निर्बंध नको असतील तर शिस्त पाळा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नागरिकांना आवाहन

मुंबई – कोविड निर्बंध नको असतील, तर नागरिकांनी स्वतःहून शिस्त पाळावी. मास्क वापरावा, लसीकरण करून घ्यावे, हात धुवावे आणि अंतर ठेवावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले. मुख्यमंत्र्यांनी आज वर्षा निवासस्थानी कोविड टास्क फोर्स च्या सदस्यांशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या.
16 एप्रिल रोजी राज्यात सर्वात कमी 626 सक्रिय रुग्ण होते. आज दीड महिन्यात त्यात सात पटीने वाढ झाली असून ती संख्या 4500 वर गेली आहे. मुंबई, ठाणे, पुणे तसेच महानगर क्षेत्रात राज्याच्या एकूण रुग्ण संख्येच्या 97 टक्के रुग्ण आहेत. मुंबईचा पॉझिटीव्हीटी दर 6 टक्के असून राज्याचादेखील वाढून 3 टक्के झाला आहे.
गेल्या काही दिवसांत कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिलेल्या सूचनांनुसार कोविड आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शासन पुढील पंधरा दिवस परिस्थितीवर लक्ष ठेवून असेल. कोविडचा प्रसार वाढू नये यासाठी नागरिकांनी कोविड अनुकूल व्यवहार करण्यावर भर दिला पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
लवकरच शाळा सुरू होतील. शाळेच्या बाबत जागतिक स्तरावर काय निर्णय घेतले गेले आहेत, तेथील मुलांना संसर्ग होण्याची स्थिती काय आहे, याबाबत माहिती घ्यावी, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
फिल्ड रुग्णालये सुसज्ज ठेवा –
कोविड कालावधीत उभारण्यात आलेली फिल्ड रुग्णालये व्यवस्थित आहे का पाहा. त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करुन घ्यावे. या ठिकाणी वैद्यकीय कर्मचारी आहेत का, आवश्यक पायाभूत सुविधा आहेत का याचा आढावा घ्यावा. कोविड चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. कोविड विषाणूचा नवीन व्हेरियंट आहे का, असल्यास त्याची संसर्ग क्षमता किती आहे, यावर लक्ष ठेवा, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. येणाऱ्या पावसाळ्यामुळे जलजन्य आजारदेखील डोके वर काढतात, त्यांची लक्षणे करोना सारखीच असल्याने डॉक्टरांनीदेखील अशा रुग्णांना वेळीच चाचण्या करून घेण्यास सांगावे, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.




