Alia Bhatt : “आवडत नसेल तर माझे चित्रपट पाहू नका!”; घराणेशाहीच्या टीकेला आलिया भट्टने दिले होते सडेतोड उत्तर
Alia Bhatt : करण जोहर दिग्दर्शित ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून पदार्पण केल्यानंतर तिच्यावर अशा प्रकारच्या चर्चा रंगल्या होत्या.

Alia Bhatt : बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आलिया भट्ट लवकरच ‘अल्फा’ या बहुचर्चित चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील 14 वर्षांच्या कारकिर्दीत तिने अनेक सुपरहिट आणि ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. मात्र, तिच्या यशाइतकीच तिच्या घराणेशाहीवर वारंवार चर्चा होत असते. याविषयी तिने वारंवार खुलेपणाने आपले मत व्यक्त केले आहे.
आलिया भट्ट ही प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट आणि अभिनेत्री सोनी राझदान यांची मुलगी आहे. तसेच अभिनेता इम्रान हाश्मी आणि दिग्दर्शक मोहित सुरी हे तिचे चुलत भाऊ आहेत. चित्रपटसृष्टीतील मजबूत पार्श्वभूमीमुळे तिला अनेकदा घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीकेचा सामना करावा लागला आहे. करण जोहर दिग्दर्शित ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून पदार्पण केल्यानंतर तिच्यावर अशा प्रकारच्या चर्चा रंगल्या होत्या. (Alia Bhatt)
मात्र, या टीकेला आलियाने न जुमानता ठामपणे उत्तर दिले आहे. ‘मिड-डे’ला दिलेल्या एका मुलाखतीत ती म्हणाली होती, “मी प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध करू शकत नाही. जर तुम्हाला मी आवडत नसेल, तर माझे चित्रपट पाहू नका. लोक काही ना काही बोलतच राहतात. माझ्या कामातून आणि चित्रपटांतून मी हे दाखवून देईन की मी आज ज्या स्थानावर आहे, त्यासाठी पात्र आहे.”
त्यानंतर 2023 मध्ये ‘हार्पर्स बाझार अरेबिया’ला दिलेल्या मुलाखतीत आलियाने घराणेशाही आणि विशेषाधिकारांविषयी खुलेपणाने भाष्य केले होते. तिने मान्य केले की, तिला मिळालेल्या संधींबाबत ती जागरूक आहे आणि म्हणूनच ती आपल्या प्रत्येक कामात शंभर टक्के योगदान देते. तिच्या मते, अभिनयाची जबाबदारी तिने कधीही हलक्यात घेतलेली नाही. (Alia Bhatt)

Alia Bhatt : “आवडत नसेल तर माझे चित्रपट पाहू नका!”; घराणेशाहीच्या टीकेला आलिया भट्टने दिले होते सडेतोड उत्तर
दरम्यान, आलिया आता यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्समधील ‘अल्फा’ या अॅक्शनपटात झळकणार आहे. शिव रावळ दिग्दर्शित आणि आदित्य चोप्रा निर्मित हा चित्रपट 3 जुलै 2026 रोजी प्रदर्शित होणार असून, नुकताच त्याचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, चित्रपटात आलिया अॅक्शन अवतारात झळकली आहे. (Alia Bhatt)
हेही वाचा : Eatha Teaser : प्रेग्नेंट विठाबाईच्या भूमिकेतील श्रद्धा कपूरचा थरारक अभिनय; अंगावर काटा आणणारा टीझर समोर





