Bala Darade : नाशिकमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपमहानगरप्रमुख बाळा दराडे यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी नाशिकमध्ये आल्यास त्यांच्या तोंडाला काळे फासू, अशी इशारावजा धमकी दिली आहे. त्यांच्या या विधानाने मोठी खळबळ उडाली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त नाशिकमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बाळा दराडे सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी एका वाहिनीशी बोलताना हे विधान केले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात एकही अपशब्द खपवून घेतला जाणार नसल्याचे देखील ते म्हणाले आहेत. दराडेंच्या या इशारावजा धमकीने काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राहुल गांधींना कोणी धमकी देत असेल तर आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा दिला आहे. दराडे यांनी केलेल्या विधानानंतर महाविकास आघाडीत मोठी खळबळ उडाली असून त्यांच्या विधानाचा निषेध काँग्रेस पक्षाने केला आहे. यामुळे दराडे यांनी केलेल्या व्यक्तव्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. या प्रकरणी पक्षाचे पदाधिकारी पोलीस आयुक्तांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. आता या प्रकरणी पोलीस प्रशासन काय कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. नेमकं काय म्हणाले बाळा दराडे? आम्ही स्वातंत्र्यवीर सावकरांच्या जन्मभूमीत राहतो, याचा आम्हाला अभिमान आहे. राहुल गांधी यांनी सावकरांविषयी जे अपशब्द वापरले, त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. सावकरांविरोधात कोणीही अपशब्द वापरला तर आम्ही शांत बसणार नाही, राहुल गांधी नाशिकमध्ये आल्यास त्यांच्या तोंडाला काळे फासू आणि जर शक्य नसेल तर दगडफेड करण्याची वेळ येईल, अशी थेट इशारावजा धमकी दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले… स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत जे काही ऐतिहासिक संदर्भ आणि दाखले आहेत. तेच डोळ्यांसमोर ठेवण्याचे काम राहुल गांधी यांनी केले आहे. त्यामुळे राहुल गांधी यांना कोणी धमकी देत असेल तर आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी बाळा दराडे यांना दिला आहे. उबाठासेनेने हात झटकले… बाळा दराडे यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी शिवसेना उबाठा गटातील काही नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. शिवसेना उबाठाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दराडे यांनी व्यक्त केलेली भूमिका ही पक्षाची भूमिका नसल्याचे म्हटले आहे. मात्र, दराडे यांनी केलेल्या विधानावर काँग्रेस आणि उबाठा सेनेत मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.