Supriya Sule : ‘दोघे एकत्र येत असतील तर तो सुवर्णक्षणच’; सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं

पुणे : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे बंधू पुन्हा एकत्र येणार, अशी जोरदार हवा रंगली असतानाच राजकारणात दुभंगलेले बारामतीचे पवार घराणेही पुन्हा एकत्र येणार का? याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. कारण साखर संकुलमधील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) कार्यालयामध्ये ‘कृषी क्षेत्रात एआयचा वापर’ या विषयावर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी या बैठकीला अजित पवार आणि शरद पवार उपस्थित राहिले होते. त्यांच्यामध्ये अर्धा तास खलबतं झाली. Supriya Sule |
दरम्यान, आमदार रोहित पवार यांची एक्स पोस्ट आणि खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वच राजकीय पक्षांनी, कुटुंबांनी एकत्र येणे ही चांगली गोष्ट आहे, असं मत खासदार सुप्रिया सुळे यांनी ठाकरे बंधूसंबंधित सोमवारी (दि. २१) बारामतीत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. यानिमित्त दोन्ही पवार एकत्र येतील का? अशा चर्चा आता रंगल्या आहेत.
तर ठाकरे कुटुंब एकत्र आले, तर हा सुवर्णक्षण असेल, त्यासाठी राज्यातील इतर राजकीय कुटुंबांनी एकत्र यावे, असं ट्विट आमदार रोहित पवार यांनी केले होते. यावर खासदार सुळे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, याचे मी स्वागतच करते..! खरेतर हे मीच सुरुवातीला बोलले आहे. दोघेही एकत्र येत असतील, तर तो सुवर्णक्षणच असेल, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली. Sharad Pawar |
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चेनंतर आता पवार काका- पुतणे एकत्र येणार असल्याची चर्चा रंगली आहे. या वातावरणातच शरद पवार आणि अजित पवार यांच्या गेल्या महिनाभरात निरनिराळ्या संस्थांच्या बैठकांच्या निमित्ताने भेटी होत आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या एका बैठकीत तर त्यांनी एकाच व्यासपीठावर शेजारी बसत एकमेकांशी संवाद साधला, तर सोमवारी वसंतदादा शुगर संस्थेच्या बैठकीत त्यांनी बंद दाराआड चर्चा देखील केली. यामुळे बारामतीचे पवार काका-पुतणे देखील लवकरच एकत्र येतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.





