‘ट्रम्प यांनी हल्ला केल्यास अमेरिकी तळांना उडवू’; इराणचा शेजारील राष्ट्रांना थेट इशारा

तेहरान: इराणमध्ये सुरू असलेल्या जनक्षोभादरम्यान आता अमेरिका आणि इराणमधील तणाव टोकाला पोहोचला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर लष्करी कारवाई करण्याची धमकी दिल्यानंतर, इराणनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. “जर अमेरिकेने इराणवर एअरस्ट्राइक केला, तर प्रत्युत्तर म्हणून संबंधित देशांतील अमेरिकी सैन्य तळांना लक्ष्य केले जाईल,” असा स्पष्ट इशारा इराणने शेजारील राष्ट्रांना दिला आहे.
इराणने सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती (UAE), तुर्की आणि इतर शेजारील देशांना अधिकृत संदेश पाठवला आहे. या पत्रात इराणने म्हटले आहे की, ज्या देशांच्या भूमीवर अमेरिकेचे लष्करी तळ आहेत आणि जर तिथून इराणवर हल्ल्याचा प्रयत्न झाला, तर त्या तळांना उद्ध्वस्त केले जाईल. वॉशिंग्टनला अशा कोणत्याही घातक पाऊलापासून रोखावे, असे आवाहनही तेहरानने या देशांना केले आहे. इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाकर कलीबाफ यांनी अमेरिकी तळांसह इस्रायललाही निशाण्यावर घेण्याचे संकेत दिले आहेत.
ट्रम्प यांची ‘ठोस कारवाई’ची धमकी
इराणमध्ये सरकारविरोधी निदर्शने करणाऱ्या आंदोलकांना फाशी देण्याच्या निर्णयावर डोनाल्ड ट्रम्प यांनी संताप व्यक्त केला आहे. “मदत लवकरच पोहोचेल,” असे सांगत ट्रम्प यांनी इशारा दिला आहे की, जर आंदोलकांवर हिंसक कारवाई थांबली नाही, तर अमेरिका अत्यंत कडक’ लष्करी पाऊल उचलेल. एका दाव्यानुसार, इराणमधील या हिंसाचारात आतापर्यंत २,६०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
⚡️BREAKING
Iran has warned countries in the region that it will attack US bases on their territory if Trump attacks Iran
The warning has been taken serious
The Turkish foreign minister has now spoken twice with the Iranian foreign minister in the last 24 hours
Turkey has… pic.twitter.com/43jpQwIFuY
— Iran Observer (@IranObserver0) January 14, 2026
युद्ध टाळण्यासाठी तुर्कीची मध्यस्थी
मध्यपूर्वेतील परिस्थिती पाहता तुर्कीने तणाव कमी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. तुर्कीचे परराष्ट्र मंत्री हकान फिदान यांनी गेल्या २४ तासांत इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्याशी दोनदा संवाद साधला. चर्चेद्वारे मार्ग काढण्याचे आवाहन तुर्कीकडून केले जात आहे. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव कतारमधील ‘अल उदैद’ एअर बेसवरून काही अमेरिकी कर्मचाऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
इराणने अमेरिकेसोबतची सर्व प्रकारची थेट चर्चा सध्या स्थगित केली आहे. यामुळे राजनैतिक मार्गाने प्रश्न सुटण्याची शक्यता धूसर झाली असून संपूर्ण आखाती क्षेत्रात युद्धाचे सावट पसरले आहे. शेजारील राष्ट्रांमध्ये या घडामोडींमुळे मोठी घबराट निर्माण झाली आहे. दरम्यान, वाढलेली प्रचंड महागाई आणि चलनाचे ऐतिहासिक अवमुल्यन आणि महिलांवरील कठोर हिसाबसक्ती नियमांमुळे जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे.





