बाळासाहेब असते तर अशा नेत्यांचं थोबाड फोडलं असतं; मुख्यमंत्री शिंदेंची अरविंद सावंतावर टीका

मुंबई : शिवसेना – उद्धव बाळासाहेब पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार अमिन अमीरअली पटेल यांच्या प्रचारादरम्यान शायना एनसी यांच्या बद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केले. यामुळे राज्यातून संताप व्यक्त केला जात आहे. “त्या आयुष्यभर भाजपात राहिल्या आणि आता शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षात आल्या. पण इथे इम्पोर्टेड चालत नाही. आमच्या इथे ओरिजनल माल चालतो.” असे खासदार अरविंद सावंत म्हणाले होते.
सावंत यांच्यावर गुन्हा दाखल
शिवसेना – उद्धव बाळासाहेब पक्षाचे नेते आणि खासदार अरविंद सावंत यांच्यावर मुंबईमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईच्या नागपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शायना एनसी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल
शायना एनसीबाबत जे विधान केलंय त्यांचा निषेध करतो. बाळासाहेब असते तर अशा नेत्यांचं थोबाड फोडलं असतं. लाडक्या बहिणीच्या बाबत असं विधान करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी अरविंद सावंतांवर टीका केली आहे.





