एवढ्या समस्या असतील तर… वानवडी ‘स्मार्ट सिटी’ कशी होणार?

वानवडी – पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर झाडांच्या वाढलेल्या धोकादायक फांद्या, बंद असलेली सार्वजनिक शौचालय, सर्वत्र पडलेले खड्डेच खड्डे, नाले सफाई, गल्लोगल्लीत पडलेला कचरा, कार बाजारमुळे जांभूळकर मळ्यातील नागरिकांची होणारी गैरसोय, रामटेकडी स्मशानभूमीत पाण्याची गैरसोय, घाणीतील डुकरांचा वावर, जांभूळकर चौकातील पॅचचे काम, सन ग्रेस शाळेजवळच्या रस्त्याची दुर्दशा, 93 अव्हेन्यू मॉलची परवानगी, वानवडीतील बालाजी सुपर मार्केट दुकाने पालिकेने विकत घेतली आहेत का?
संपूर्ण पदपथांची लागलेली वाट यासह शेकडो समस्या असतील तर वानवडीची “स्मार्ट सिटी’ कशी होणार? असा सवाल वानवडी क्षेत्रीय कार्यालयातील मोहल्ला कमिटीच्या मिटिंगमध्ये शेकडो नागरिकांनी केला. त्यानंतर सहायक आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे याची कोणतीही उत्तरे नव्हती, त्यामुळे यावेळी झालेली मिटिंग ताणतणावात झाली.
मिटींगला राजकीय लोकांचे “खबरी’
नागरीकांनी मिटिंगमध्ये काही समस्या मांडली तर अधिकारी, कर्मचारी लगेच राजकीय लोकांना फोन करून संबंधीत नागरिकांची नावे सांगतात. स्वत:ला पुढारी म्हणवणारे काही जण अशा मिटींगला आपले “खबरी’ पाठवतात. त्यामुळे अशा मिटींगमध्ये मांडण्यात आलेल्या समस्या, प्रश्नांचा वापर ही मंडळी लगेच एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यासाठी करतात. मिटींगची अशी पद्धत बंद व्हायला हवी, अशी रोखठोक भूमिका यावेळी नागरिकांनी मांडली.
मोहल्ला कमिटीच्या व्हॉट्सऍप ग्रुपवरच नागरिकांची कामे व्हावीत असा उद्देश आहे. काम होईपर्यंत अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करावा, याबाबत नक्कीच दखल घेतली जाईल. कामात कोठे दुजाभाव होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधीतावर कारवाई केली जाईल, असे शाम तारू (सहाय्यक आयुक्त, वानवडी क्षेत्रीय कार्यालय) म्हणाले.





