‘इथं कमळाचं बटन दाबलं की करंट इटलीमध्ये जाऊन लागला पाहिजे’, अमित शहा अकोल्यात काय-काय बोलले वाचा

अकोला – येथे कमळाचे बटन एवढ्या ताकतीने दाबा की, बटन अकोल्यात दबले की करंट इटलीमध्ये जाऊन लागले पाहिजे, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोनिया गांधी यांच्यावर टीका केली आहे. ( Akola Lok Sabha Election 2024)
अकोला लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारासाठी अमित शहा यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. मी आज शरद पवार यांना प्रश्न विचारणार आहे. मात्र, उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारुन काहीही उपयोग नाही. त्यांना तर आपल्या मुलाव्यतिरीक्त काहीच दिसत नसल्याची टीका अमित शहा यांनी केली आहे.
या वेळी शहांनी काँग्रेसच्या वतीने करण्यात येणाऱ्या आरोपांनाही प्रत्युत्तर दिले. जोपर्यंत भारतीय जनता पक्ष आहे, तोपर्यंत या देशातून एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण कोणीच हटवू शकत नाही. ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गॅरंटी असल्याचा दावा देखील अमित शहा यांनी केला आहे.
सिंचन योजनेमध्ये महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे – फडणवीस सरकारने देखील अनेक कामे केली असल्याचे अमित शहा यांनी म्हटले आहे. अकोला जिल्ह्यातील दुष्काळ कायमस्वरूपी दूर करण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि आमचे सरकार प्रयत्न करत असल्याचे देखील शहांनी म्हटले आहे.
शरद पवारांना हिशेब द्यावाच लागेल –
शरद पवार हे मनमोहन सिंग सरकारच्या कार्यकाळात केंद्र सरकारमध्ये होते. कृषी मंत्रालय सांभाळत होते. मग त्या दहा वर्षांच्या काळात सोनिया आणि मनमोहन सिंग सरकारने किती पैसा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिला? असा सवाल अमित शहा यांनी उपस्थित केला. मात्र या प्रश्नाचे उत्तर शरद पवार देणार नाहीत.
त्या दहा वर्षात महाराष्ट्रात मनमोहन सिंग यांच्या सरकारने एक लाख 91 हजार करोड रुपये दिले, तर मोदी सरकारने दहा वर्षांच्या कार्यकाळातच 7 लाख पंधरा हजार कोटी रुपये महाराष्ट्रला दिल्याचा दावा देखील शहांनी केला. या व्यतिरिक्त दोन लाख 90 हजार कोटी इन्फ्रास्ट्रक्चरच्या विकासासाठी, चार हजार कोटी विमानतळासाठी नरेंद्र मोदी सरकारने दिले असल्याचे अमित शहा यांनी सांगितले.





