विशेष : अतिक्रमणमुक्त शहरे?

सामान्य जनता, महापालिकेचे अधिकारी व पोलीस यंत्रणेने हातात हात घालून काम केले तर निश्चितच महाराष्ट्र राज्यातील अनेक शहरे अतिक्रमणमुक्त व्हायला वेळ लागणार नाही.
शहर वाहतूककोंडी मुक्त होण्यासाठी “अतिक्रमण हटाव’सह रस्त्यावरील अडथळे दूर करण्यासाठी अधूनमधून नागरिक सातत्याने आवाज उठवत असतात, मात्र त्याची दखल शासन आणि प्रशासन घेताना दिसत नाही. सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने ही अतिक्रमणे नेहमीच अडचणीची व त्रासदायक ठरणारी असतात. ही अतिक्रमणे हटविल्यामुळे रस्त्यावरून पायी चालत जाणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळतो. यातील काही अतिक्रमणे ही वर्षानुवर्षे जणू आपल्या मालकीची जागा असल्याच्या अविर्भावात ठाण मांडून बसलेली आहेत. या संदर्भात व्यापारी व फेरीवाले हे नेहमीच उद्धटपणाने वागताना दिसतात. अशा बऱ्याच शहरातील नागरिकांच्या तक्रारी आहेत, त्यामुळे सातत्याने अतिक्रमण हटाव मोहिमेच्या धडक कारवाईची नितांत आवश्यकता आहे, त्यामुळे बाजारपेठेतील भररस्त्यात अतिक्रमण करणारे व्यापारी, पदपथावर अतिक्रमण करणारे फळ विक्रेते तसेच शहरातील अनेक भागांत सार्वजनिक ठिकाणी बिनधास्तपणे विनापरवाना व्यवसाय करणाऱ्यांना चांगलाच चाप बसेल, असे वाटते.
सध्या मोठ्या शहरापासून ते तालुक्याच्या लहान गावातही रस्त्यावरील रहदारीच्या प्रमाणात भयंकर वाढ झालेली आहे. त्याला कारण वाहनांची संख्या भरमसाठ वाढलेली आहे हे जसे आहे, तसे रस्त्यावर केलेली बेसुमार व बेकायदेशीर अतिक्रमणे हे देखील आहे. वाहनांच्या संख्येत वाढ झाली की वाहतुकीच्या शिस्तीचे बारा वाजतात, यानुसार शहरातील रहदारीचा व वाहतूक शिस्तीचा प्रश्न जटील झाला आहे. अनेक शहरातील बहुसंख्य रस्ते अरूंद आहेत, त्यातच रस्त्याच्या कडेला असलेल्या घरमालकांनी व व्यावसायिकांनी आपल्या घराच्या व दुकानाच्या पुढची जास्तीत जास्त जागा अडवून तिथे काही ना काही माल ठेवून त्यावर कब्जा केला आहे. अर्थात, “तो करतो मी का नाही’, असे म्हणत सगळेच अतिक्रमण करत आहेत.
वाहनांची संख्याही प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे, मात्र रस्ते पूर्वीपासून आहेत तेवढेच व तसेच आहेत, साहजिकच रस्त्यावरील वाहनांचा ताण वाढला आहे. तर रस्त्यांच्या दुतर्फा अतिक्रमणे असल्यामुळे नागरिक रस्त्यावरून चालतात. त्यामुळे आणखी वाहतूककोंडी होते.
मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांत महानगरपालिकेच्या प्रयत्नांमुळे रस्ते प्रशस्त आणि रस्ते रूंद झाले आहेत. आधुनिक रस्ते बांधणीमुळे रहदारीत नियम व शिस्त निर्माण झाली आहे, चौकाचौकात सिग्नलची सोय झाली आहे, आता तर जपानच्या तोडीचे ओव्हर फ्लाय, ओव्हर ब्रिज तसेच अंडरग्राउंड रस्ते झाले आहेत, बहुतेक महानगरपालिका रहदारीला शिस्त लागावी म्हणून रस्ते विकासासाठी भरपूर निधी खर्च करून अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून देत आहेत, ही गोष्ट स्वागतार्ह आहे. मात्र इतर शहरांत हेच चित्र उलटे दिसते.
बहुतेक शहरातील रस्ते व पदपथ नागरिकांसाठी आहेत की फेरीवाल्यांसाठी, असा प्रश्न नागरिकांना पडतो. गजबजलेल्या रस्त्यावर फेरीवाल्यांसह, पदपथावर मालविक्री करणारे तसेच विनापरवाना डिजिटल फलकांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केलेले दिसून येते. काही रस्त्यांवर निम्म्यापेक्षा जास्त जागा फेरीवाल्यांसह व्यावसायिकांनी जणू आरक्षितच केलीय असे भासवले जात आहे. अर्थात, या सर्वांमुळे शहरातील रहदारी खूपच धोकादायक झाली आहे. अनेक शहरातील नागरिकांना रस्त्यावरून पायी चालत असताना अक्षरशः जीव मुठीत धरून चालावे लागते. कारण रस्त्यावरून चालल्यामुळे अपघात होण्याची शक्यता अधिक असते. शिवाय मोकळा पदपथ नसल्यामुळे भुरटे चोर महिलांचे दागिणे चोरतात, अशा अनेक घटना सतत घडतात. शाळेतील लहान लहान मुलांचे तर हाल बघवत नाहीत. रस्त्यावरून चालत जाणाऱ्या महिला व शाळकरी मुला-मुलींच्या उडणाऱ्या तारांबळचे वर्णनच करता येत नाही. या रहदारीमुळे तसेच अतिक्रमणामुळे नागरिकांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागतो. बेकायदेशीर प्रवासी वाहतूक बिनदिक्कतपणे सुरू आहे. वाहतूक पोलिसांच्या नजरेसमोरून एका रिक्षात पाच-पाच, सहा-सहा प्रवासी कोंबून वाहतूक सुरू असते. एकाच दुचाकीवर तिघे-चौघे बसून रस्त्यावरून जाताना दिसतात. कायद्याची भीतीच नाही, अशी मानसिकता तयार झाली आहे.
महापालिकेने विविध विकासकामांसाठी ज्या जागा आरक्षित केलेल्या आहेत त्या जागांवर बेकायदेशीर व्यवसाय करणारे तसेच खाद्यपदार्थ विकण्याचा व्यवसाय करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. रस्त्यावर केलेली अतिक्रमणे काढणे जेवढे महत्त्वाचे तेवढेच ती पुन्हा होऊ नयेत यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे, अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या कर्मचाऱ्यांनी अतिक्रमण निर्मूलनासाठी धडक कारवाई केली की, त्याच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर लोकप्रतिनिधी दबाव आणू पाहतात. कारण अनेकदा लोकप्रतिनिधींचे हितसंबंधच अतिक्रमणाची कारवाई करण्यात अडसर ठरतात. मात्र, अतिक्रमणाला विरोध करून आसपासच्या नागरिकांनीसुद्धा कायद्याचा आदर करून प्रशासनाचे मनोबल वाढविण्यासाठी पुढे आले पाहिजे. तरच शहरे सुंदर व अतिक्रमणमुक्त ही संकल्पना साकार होईल.
रस्त्यावर किंवा रस्त्याच्या कडेला उभे राहणाऱ्या तरुणांच्या घोळक्यामुळे बऱ्याचवेळा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्याचे जे नियम आहेत- डाव्या बाजूने जाणे, रस्त्यावर मधोमध वाहने उभी न करणे, टोळ्यांनी रस्त्यावर बोलत उभे न राहणे, यासाठी पोलिसांनीसुद्धा प्रबोधन करणे गरजेचे आहे. वाहतुकीला शिस्त लावणे हे काम पोलीस खात्याचे आहे, ते त्यांनी चोख बजवायला हवे. त्यासाठी कर्तव्य कठोर होणे आवश्यक आहे. शहर वाहतूक पोलिसांनीसुद्धा आठवड्यातून एकदा बेकायदेशीर वाहतूक विरोधात मोहीम उघडायला हवी, म्हणजे रहदारीला चांगली शिस्त लागेल.
रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्यांना व फेरीवाल्यांसह अतिक्रमण करणाऱ्यांना एकदा दोनदा सांगितल्यावरसुद्धा ऐकत नसतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी कारवाई नेहमीच व सर्वांवरच करण्याची गरज भासणार नाही, काही नमुन्यादाखल अशा कारवाया करा, मग बघा, अतिक्रमणावर चाप बसेल, तसेच रहदारीला शिस्तही लागेल. शहरे सुंदर करण्याबरोबरच ते नागरिकांना सुरक्षित वाटणं, हे महत्त्वाचे व अगत्याचे आहे.





