सत्ता आल्यास आशा स्वयंसेविकांच्या मानधनात 5 हजार रुपयांची वाढ

विजय वडेट्टीवार यांचे आश्‍वासन

मुंबई: राज्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांची मानधनात वाढ करण्याची मागणी योग्य असून भाजप-शिवसेना सरकारने पाच वर्षात त्यांच्या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षताच दिल्याचा आरोप करत कॉंग्रेस आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यास त्यांच्या मानधनात पाच हजार रुपयांची वाढ करु, असे आश्वासन विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर यांनी दिले आहे.

राज्यातील 64 हजार आशा स्वयंसेविका आपल्या मागण्यांसाठी राज्याच्या अनेक भागात आंदोलन करत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी मतदार संघात आशा स्वयंसेविकांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची भेट घेऊन आपल्या समस्या व मागण्या त्यांच्या समोर मांडल्या. तुटपुंज्या मानधनावर काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी वडेट्टीवार यांनी आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांच्या मागण्या योग्य असून आघाडी सरकार सत्तेवर आल्यास पाच हजार रुपयांची वाढ करण्याचे आश्वासन दिले आहे.

आशा स्वयंसेविकांनी मानधनवाढीच्या मुद्यावर वारंवार आंदोलने करून मोर्चेही काढले. फेब्रुवारी 2019 मध्ये सार्वजनिक आरोग्यमंत्र्यांनी मागण्या मान्य करण्याचे आश्वासनही दिले होते, परंतु अद्याप त्यावर कार्यवाही झालेली नाही. त्यानंतर पुन्हा मानधनात अडीच ते तीनपट वाढ करण्याचे आश्वासन आरोग्य मंत्र्यांकडूनच देण्यात आले होते. जूनमध्ये मंत्रालयावर मोर्चाही काढण्यात आला होता. परंतु अजूनही त्यांना न्याय मिळालेला नाही. गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांना मिळणारे मानधन किमान वेतनाखालील असून त्यांना वेठबिगारासारखे राबविले जाते. वारंवार आंदोलनाचा पवित्रा घेऊनही त्यांच्या मागण्या सरकारकडून गांभिर्याने घेतल्या गेल्या नाहीत, असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)