Actress Indira Krishnan : सिनेमा इंडस्ट्रीत काम करणारे कलाकार त्यांच्यासोबत झालेल्या कास्टिंग काऊचचे अनुभव शेअर करताना दिसत आहेत. अभिनय क्षेत्रातील अनेक अभिनेत्रींनी त्यांना आलेल्या धक्कादायक अनुभवांचा खुलासा मुलाखतीमधून केला आहे. नुकतीच अभिनेत्री इंदिरा कृष्णनने तिच्यासोबत घडलेल्या कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव एका मुलाखतीत शेअर केला आहे. इंदिरा लवकरच नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ या बिग बजेट चित्रपट कौशल्याच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. बॉलिवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीत इंदिरा कृष्णनने मनमोकळ्या गप्पा मारल्या. बॉलिवूडच्या तुलनेत दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत अशा प्रकारच्या अनुभवांचा अधिक सामना करावा लागत असल्याचे तिने म्हटले आहे. माझ्यासोबत असं फक्त एकदा नाही तर अनेकदा घडलंय, असा धक्कादायक खुलासा तिने केला आहे. मी असं म्हणणार नाही की कास्टिंग काऊचचे अनुभव मला हिंदी फिल्म इंडस्ट्री किंवा मुंबईत अधिक आले. किंबहुना दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत मी या गोष्टी जास्त पाहिल्या आहेत, असं तिने सांगितलं. एका मोठ्या प्रोजेक्टसाठी अभिनेत्री इंदिरा कृष्णनला कास्ट करण्यात आलं होतं. त्या प्रोजेक्टच्या बाबतीत आमच्यात काही मतभेद होते. मी त्या प्रोजेक्टसाठी पूर्णपणे तयार नव्हती. मी सर्वांत आधी हा विचार केला की हा चित्रपट माझ्या हातून गेला. नंतर घरी पोहोचल्यावर मी निर्मात्याला एक मेसेज टाइप करून पाठवला. मी माझी प्रतिभा विकायला आली आहे, स्वत:ला नाही. त्यामुळे मला वाटतं की तुम्ही जितके स्पष्ट असाल तितकं उत्तम असतं. त्यामुळे तुम्हाला तुमची ऊर्जा वाढवण्यात गती कायम ठेवण्यात आणि पुढे चालत राहण्यास मदत मिळते, असे तिने मुलाखतीत सांगितलं. इंदिरा कृष्णनने पुढे सांगितलं की, कास्टिंग काऊचचा हा पहिला किंवा शेवटचा अनुभव नव्हता. यामुळे तिने बरेच चांगले प्रोजेक्ट्स गमावले होते. मात्र, करिअरच्या याच टप्प्यावर असताना तिने टेलिव्हिजनवर अभिनय करण्याच ठरवलं. छोट्या पडद्यावर काम करून मानसिक समाधान मिळाल्याचं तिने स्पष्ट केलं.