“हिंदू नाही तर बळीराजा खतरे में है! ओला दुष्काळ जाहीर करा”; रोहित पवारांची मागणी

Rohit Pawar | मराठवाड्यातील अनेक भागांत रविवारी रात्रीपासून पावसाने पुन्हा कहर केला आहे. धाराशिव जिल्ह्यातील परंडा, बीडमधील पाटोदा, शिरूर, जालना शहर यासह बहुतांश भागांत मुसळधार पावसाने पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला असून ग्रामीण भागातील वाहतूक विस्कळीत झाली आहे. या मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणावर शेतीपिकांचं नुकसान झालं आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवारांनी ‘आज हिंदू नाही तर बळीराजा खतरे में है! अशा परिस्थितीत आता पंचनाम्याचा हट्ट न धरता ओला दुष्काळ जाहीर करा,’ अशी मागणी केली आहे.
रोहित पवार यांची पोस्ट –
रोहित पवार यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट करत लिहिले की, “अतिवृष्टीने राज्यात भयावह परिस्थिती निर्माण झाल्याने मायबाप सरकारला सांगायचंय, आज जाती-धर्मात वाद करण्यापेक्षा हिंदू, मुस्लिम, ओबीसी, एससी, एसटी या सर्वच समाजाचे शेतकरी अडचणीत आहेत. म्हणूनच राजकारण बाजूला ठेवून माणुसकी धर्माला आणि महाराष्ट्र धर्माला जागून शेतकऱ्याला तातडीने मदत करण्याची नितांत गरज आहे. आधी अवकाळी आणि आता अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं अक्षरशः कंबरडं मोडलंय.” Rohit Pawar |
‘हीच योग्यवेळ कर्जमाफीही जाहीर करा’
“शेतीचं झालेलं नुकसान बघितलं तर शेतकऱ्यांना निकषापेक्षा कितीतरी जास्त मदत करण्याची गरज आहे. आज हिंदू नाही तर बळीराजा खतरे में है..! अशा परिस्थितीत आता पंचनाम्याचा हट्ट न धरता आजच्या कॅबिनेट बैठकीत ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये मदतीची घोषणा करा आणि हीच योग्यवेळ असल्याने कर्जमाफीही जाहीर करा, ही आक्रोश करणाऱ्या बळीराजाच्यावतीने कळकळीची विनंती,” असे रोहित पवारांनी ट्वीट करत शेतकऱ्यांना मदत करण्याचे आवाहन राज्य सरकारला केले आहे. Rohit Pawar |
जामखेड तालुक्यातील धोकादायक स्थिती
जामखेड तालुक्यातील सीना नदीच्या काठावर वसलेल्या या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान होत आहे. पाणी शेतांत घुसल्याने पिके उद्ध्वस्त झाली असून, गावांचा संपर्क तुटण्याची भीती आहे. स्थानिक प्रशासनाने एनडीआरएफ आणि स्थानिक मदत दलांना सतर्क करण्याचे आदेश दिले आहेत. शेतकऱ्यांनी आपला माल आणि कुटुंब सुरक्षित स्थळी हलवावा, असे आवाहन तहसीलदारांनी केले आहे. मागील काही दिवसांत मुसळधार पावसामुळे नदीला पूर आल्याने परिसरातील पूल आणि रस्ते पाण्याखाली गेले आहेत, ज्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे.
सोलापुरात बिकट पुरस्थिती
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील संगोबा गावात पुराची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. नदीकाठच्या लोकांनी जीव मुऱ्या वाचवण्यासाठी आदिनाथ मंदिरात आश्रय घेतला आहे. सीना-कोळेगाव धरणातून विसर्ग वाढल्याने पाणीपातळी वेगाने वाढत असून, गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. स्थानिकांनी मदत मागवली असून, ग्रामस्थ आणि मदत दलांकडून अन्नधान्य आणि वैद्यकीय मदत पुरवली जात आहे.
अक्कलकोट तालुक्यातील जेऊर गावात सायंकाळी ढगफुटीसदृश पाऊस झाला. या मुसळधार पावसामुळे ओढ्यांना पूर आला आणि पाण्याचे लोंढे थेट गावात शिरले. गावातील वेशीपर्यंत गुडघाभर पाणी साचले होते, तर धनगर गल्लीतील अनेक घरांमध्ये पाणी घुसल्याने लोकांची तारांबळ उडाली. याशिवाय केळी, ऊस, तूर, सोयाबीन आणि सूर्यफूल यांसारख्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
हेही वाचा:
सीतेच्या भूमिकेतील साई पल्लवी स्वीमसूटमध्ये; नेटकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी





