Chirag Paswan : नितीश यांचा प्रस्ताव आला तर चर्चा होईल; उपपंतप्रधान पदाबाबत चिराग यांची भूमिका

नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे बिहारमधील ज्येष्ठ नेते अश्विनी चौबे यांनी अलीकडेच मुख्यमंत्री नितीश कुमार यांना उपपंतप्रधान बनवण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत खांद्याला खांदा लावून चालत आहेत. नितीश कुमार यांना उपपंतप्रधानपद देण्यात यावे. जर असे झाले तर ते बिहार या राज्यातून देशाचे दुसरे उपपंतप्रधान असतील असे चौबे म्हणाले होते. चौबे यांच्या विधानानंतर बिहारमध्ये राजकीय खळबळ उडाली आहे. केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
कोणत्याही विशिष्ट व्यक्तीने मागणी केल्यामुळे चर्चा सुरू होऊ शकत नाही. जर असा कोणताही औपचारिक प्रस्ताव राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये आला तर आघाडीमध्ये चर्चा होईल, त्यानंतरच कोणतीही टिप्पणी करणे योग्य ठरेल असे पासवान यांनी म्हटले आहे.
पासवान यांच्या या विधानावर राष्ट्रीय जनता दलाचे नेते मृत्युंजय तिवारी म्हणाले की, भारतीय जनता पक्ष आणि एनडीए मुख्यमंत्री नितीश कुमार यांना हटवायचे बघत आहेत. भाजप नेते कधी नितीश कुमार यांना भारतरत्न देण्याबद्दल बोलतात तर कधी त्यांना उपपंतप्रधान बनवण्याबद्दल बोलतात. या नेत्यांच्या विधानांवरून स्पष्ट होते की मुख्यमंत्री नितीश कुमार पूर्णपणे अस्वस्थ आहेत आणि भाजप आणि एनडीएचे लोक त्यांच्या प्रकृतीची खिल्ली उडवत आहेत. आता एनडीएमध्ये कोणीही नितीश कुमार यांना सहन करण्यास तयार नाही असा दावाही त्यांनी केला.





