“माझ्या केसाला धक्का लागला तर पवार कुटुंबीय जबाबदार”; ‘या’ नेत्याचा थेट इशारा

Laxman Hake – ओबीसी आरक्षण नेते लक्ष्मण हाके आणि राष्ट्रवादीतील नेत्यांचे वाकयुद्ध सुरुच असल्याने दोन्ही बाजूंनी शाब्दिक तोफगोळे फेकले जात आहेत. दरम्यान, मंगळवारीही लक्ष्मण हाकेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला आहे.
लक्ष्मण हाके यांनी एक पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. माझ्या केसाला जरी धक्का लागला तरी त्यास पवार कुटुंबीय अजित पवार आणि रोहित पवार जबाबदार असतील असा थेट इशाराच हाके यांनी दिला आहे.
मला रोज महाराष्ट्रातून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या धमक्या मिळत असून मी गावगाड्यातील मेंढपाळाचा पोरगा आहे. मी अशा धमक्यांना भीक घालत नाही.
मात्र, माझ्या केसाला जरी धक्का लागला तरी त्यास पवार कुटुंबीय अजित पवार आणि रोहित पवार जबाबदार असतील. यासंदर्भात पोलिसांकडूनही गृह विभागाकडे अहवाल गेल्याचे हाके यांनी सांगितले.
मी गोरगरीब ओबीसी समाजासाठी आणि त्यांच्या हक्क अधिकारांसाठी लढत असून अर्थ खात्याला गोचीडासारखा चिटकून बसलेले अजित पवार हे ओबीसी समाजाचा निधी देत नसल्याने माझा त्यांच्याशी वाद आहे.
मात्र ओबीसी समाजाचा अडवलेला निधी देण्याऐवजी राष्ट्रवादीचे पदाधिकारी नागपूर पासून पंढरपूर पर्यंत ज्या पद्धतीने धमक्या देऊ लागले आहेत ते पाहता माझ्यावर असा हल्ला झाल्यास या संपूर्ण पवार कुटुंब जबाबदार असेल असा इशारा हाके यांनी दिला आहे.





