“महाराष्ट्रातले उद्योग परराज्यात जात असतील तर येथील तरुणांनी फक्त भजी तळायचे का?”

मुंबई- राज्यात येणारे उद्योग अर्थात गुंतवणूक एका पाठोपाठ एक शेजारच्या गुजरात राज्यात जाते आहे. टाटा एअरबस, वेदान्त फॉक्सकॉन, सॅफ्रन यासारखे मोठे प्रकल्प परराज्यात गेले आहेत. याच कारणामुळे सध्या सत्ताधारी शिंदे गट-भाजपा आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्यातील उद्योग आणि गुंतवणुकीच्या मुद्द्यावर स्वतंत्र पत्रकार परिषदा घेत एकमेकांवर गंभीर आरोप केले. त्यानंतर आता उद्धव ठाकरे गटातील नेत्या मनिषा कायंदे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.
फडणवीसांच्या प्रत्येक दाव्याला छेद देणारी माहिती आदित्य ठाकरे यांनी काल दिली आहे. तसेच उद्योग परराज्यात जात असतील तर येथील तरुणांनी फक्त भजी तळायचे का? जेव्हा प्रश्नाचे उत्तर नसेल तेव्हा पप्पू, छोटा पप्पू, पेंग्विन असे म्हटले जाते. हे बेकायदा सरकार महाराष्ट्राचं नुकसान करणारे निर्णय घेत आहे. आज युवकांनी चहा विकायचा, भजी तळायची का? हे सरकार शिकलेल्या तरुणांना नोकरी कधी देणार? की केवळ सण उत्सव साजरे करायचे? असे बोलले की आम्हाला हिंदूविरोधी विशेषण लावले जाते.
ते युवकांना काम, रोजगार देऊ शकत नाहीत. आज सरकारची निंदानालस्ती होत आहे. सगळे उद्योग गुजरातमध्येच का जात आहेत. हा सगळा कुटील डाव सुरू आहे. यामध्ये फक्त एकनाथ शिंदे यांची निंदानालस्ती होत आहे, असे म्हणत कायंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच भाजपावर टीका केली.





