“न्याय मिळाला नाही तर उलथापालथ करावी लागेल”; मनोज जरांगेंची आक्रमक भूमिका

Dasara Melava 2024 Manoj Jarange | मनोज जरांगे यांच्या दसऱ्या मेळाव्याला सुरुवात झाली आहे. यानिमित्त नारायण गडावर मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित राहिले आहेत. आपल्या भाषणादरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरून राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. सुरुवातीला त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या लोकांचे मनापासून आभार मानले.
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
“नजर पुरेल इथंपर्यंत तुम्ही याल असे मला वाटले नव्हते. जिकडे तिकडे गर्दीच दिसत आहे. आपण या ताकदीने एकत्र याल, असे कधी वाटले नव्हते. हा जनसमुदाय न्यायाचा नुसती गर्दी पाहूनच समोरच्यांचा कार्यक्रम होईल. मराठा समुदायावर संस्कार आहेत. हा समुदाय कधीही कोणावर जातीभेद करत नाही. या समाजाने प्रत्येकाला साथ देण्याचं काम केलं. या समाजाने कधीच जातीवाद केला नाही. हा समाज मस्तीत आणि मग्रुरीत कधीच वागत नाही. प्रत्येकाला सांभाळण्याचं, साथ देण्याचं काम केलं आहे. यांनी कधी जातीवाद केला नाही या समाजाला जात कधी शिवली नाही. पण हे न्यायासाठी आंदोलन सुरू आहे. ”
जरांगेंचा राज्य सरकारवर निशाणा
राज्य सरकारवर निशाणा साधत ते म्हणाले ,”जर अडवणूक होणार असेल तर इच्छा नसतांनाही उठाव करावाच लागेल. आमच्या वाट्याला अन्याय का ?, आम्ही काय पाप केलं? आमच्या समुदायाच्या वाट्याला फक्त अन्याय आला. माझा समाज राज्य आणि देश पुढे जावा म्हणून झुंजला आहे. तलवार हातात घेवून लढला आहे. मी कधीच तुमच्या शब्दाच्या पुढे जाणार नाही. तुमच्याकडून फक्त एकच वचन हवे.. राजकारण आणि जातीचा या गडावरुन मी बोलणार नाही. तुमच्या हिताशिवाय पुढे जाणार नाही. मी ज्यावेळी तुम्हाला सांगेल त्यावेळी फक्त हट्ट धरु नका, जे सांगेल तेच करायचे आहे.”
“आपल्याविरोधात षडयंत्र केलं जातंय. आपल्याला डावललं जात आहे. जर आपल्याला न्याय मिळाला नाही तर आपल्याला यावेळी उलथापालथ करावी लागेल. त्याशिवाय पर्याय नाही. आपल्या नाकावर टिच्चून कुठला निर्णय होणार असेल आणि या राज्याच्या समाजावर अन्याय होणार असेल गाडावच लागणार आहे. शेवटी समुदाय, जनता शेतकरी महत्वाचा आहे,” असा इशाराही त्यांनी दिला.
“नारायण गडाच्या पवित्र भूमिवर तुमच्याकडून वचन हवं. तुमच्याकडून जास्त नकोय. तुम्ही मला वचन त्या, तुम्ही म्हणाले ते करायला मी तयार आहे. फक्त हट्ट धरू नका. मी कधीच तुमच्या शब्दाच्या पुढे जाणार नाही. पण मला तुमच्याकडून एकच वचन हवे. मला राजकारण आणि जातीचं या गडावरून बोलायचं नाही. तुमचं हित सोडून मी तुमच्या पुढे जाणार नाही, तुमचं काम सोडून जाणरा नाही हा गडावरून शब्द देतो,” असे जरांगे म्हणाले.




