श्रीनिवास पवारांचे वक्तव्य चर्चेत,’अजित पवार शब्दाचे पक्के असतील तर… सख्खे बंधू काय म्हणाले ?

ajit pawar | राज्यात काही महिन्यात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे . त्यासाठी सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. मात्र अजून या निवडणुकांसाठी कोणतीही तारीख जाहीर करण्यात आली नाही. अशात राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुती जागावाटपासून बैठकांचे सत्र सुरु झाले आहे. राज्यातील सर्वच पक्षांनी विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. अशात पुन्हा एकदा पवार कुटूंब चर्चेत आले. अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांच्या विधानाने राजकीय वातावरण तापले आहे.
काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी बारामतीतील कार्यकर्ता मेळाव्यात घोषणा केली होती की,’मी निवडणूक लढणार नाही. येत्या लोकसभा निवडणुकीत मी ज्या उमेदवाराला उभा करील त्याला तुम्ही खासदार केलं पाहिजे, अशी माझी इच्छा आहे. तुम्ही लोकसभेला आमच्या उमेदवाराला निवडून दिलं तरच मी विधानसभा निवडणुकीला उभा राहीन, अन्यथा मी निवडणूक लढवणार नाही, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होत. आता याच विधानाचा संदर्भ घेत श्रीनिवास पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले,’अजित पवार हे शब्दाचे पक्के असतील तर ते विधासभा लढणार नाही’ त्यांच्या या विधानाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.
दरम्यान, बारामती दौऱ्यावर असलेल्या शरद पवारांनी कार्यकर्त्यांशी बोलताना विधानसभा निवडणुकीत युगेंद्र पवारांच्या एन्ट्रीचे संकेत दिले होते. त्यामुळे बारामतीमध्ये काका अजित पवार विरुद्ध पुतणे युगेंद्र पवार असा थेट सामना होण्याची शक्यता वर्तवली जात होती. तर अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीत बारामतीतून नेमकं कोणाला तिकीट देणार यावर भाष्य केलं होत.
आगामी विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून स्वत: रिंगणात न उतरता आपला मुलगा जय पवार यांना उमेदवारी देण्याचे स्पष्ट संकेत अजित पवार यांच्याकडून देण्यात आले होते. ‘मी सात-आठ वेळा आमदार म्हणून निवडून आलोय. आता मला रस नाही. जय पवार यांच्याबाबत जनता आणि पक्षाचे कार्यकर्ते निर्णय घेतील.’ असेही त्यांनी सांगितले होते. आता विधानसभा निवडणुकीसाठी जय पवार यांच्या नावाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
कोण आहेत युगेंद्र पवार?
युगेंद्र पवार हे अजित पवारांचे धाकटे बंधू श्रीनिवास यांचे चिरंजीव आहेत. शरयू अॅग्रोचे ते सीईओ आहेत. बारामती विद्या प्रतिष्ठानचे ते खजिनदार आहेत. शांत, संयमी आणि मितभाषी नेतृत्व असे गुण त्यांच्यात आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर युगेंद्र पवार यांनी आजोबा शरद पवारांना साथ दिली. लोकसभेला सुप्रिया सुळेंच्या बाजूनं त्यांनी जोरदार प्रचार केला. सुप्रिया सुळेंना निवडून आणण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली.





