Rohit Pawar on Ajit Pawar : अजित पवार मुख्यमंत्री झाले तर मी पुतण्या म्हणून…; रोहित विधान चर्चेत

Rohit Pawar on Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री पदाची इच्छा बोलवून दाखवली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अजित पवार यांच्या मुख्यमंत्री पदाच्या चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून १ मे ते ४ मे दरम्यान मुंबईतील वरळीत गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
या महोत्सवात दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना अजित पवार यांनी ‘राज्यात महिला मुख्यमंत्री व्हावे हे सर्वांना वाटते पण ते अद्याप शक्य झालेले नाही. कित्येक वर्षे मलाही मुख्यमंत्री व्हावं वाटतं, पण तो योग कुठेही जुळून आलेला नाही,’ असे म्हणत आपल्या मनातील इच्छा व्यक्त केली आहे.
अजित पवारांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी याबाबत मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले, जर या सरकारमध्ये त्यांना मुख्यमंत्री म्हणून संधी मिळाली तर पुतण्या म्हणून मी त्याचं स्वागतच करेल, असं रोहित पवार यांनी म्हटले आहे. Rohit Pawar on Ajit Pawar |
काय म्हणाले रोहित पवार?
रोहित पवार यांनी एका मराठी वृत्त वाहिनीशी बोलताना म्हटले की, ते अनेक वर्ष उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्या पदाच्या वर मुख्यमंत्रीपदच राहते. सहाजिकच तुम्ही इतके वर्ष दोन नंबरच्या पदावर राहिला असाल तर तुमची इच्छा मुख्यमंत्रीपदाची व्हावी, असं रोहित पवार म्हणाले.
तसेच या सरकारच्या माध्यमातून अजितदादा यांना संधी दिली जात असेल तर त्यांना आवडेलच. तसेच कुटुंबाला आणि कार्यकर्त्यांना देखील आवडेल. मी त्यांचा पुतण्या म्हणून मला सुद्धा ती गोष्ट आवडेल. ते आता वेगळ्या सरकारमध्ये आहेत. पण अजित पवारांना मुख्यमंत्री पद मिळत असेल तर त्या गोष्टीचं मी नक्कीच स्वागत करेल. आनंद देखील व्यक्त करेल, असंही रोहित पवारांनी म्हटले आहे. Rohit Pawar ।
नेमकं काय म्हणाले अजित पवार ?
यावेळी ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांनी राज्याला महिला मुख्यमंत्री मिळायला हवी, असे मत मांडले. त्यावर आपल्याला सगळ्यांना तसं वाटत असतं पण शेवटी मात्र योग पण जुळून यावा लागतो. आता मलाही वाटत मी मुख्यमंत्री व्हावं कुठं जमतंय. कधी ना कधी तो योग येईल, नाही असं नाही. ममता बॅनर्जी झाल्या, जयललितांनी स्वत:च्या ताकदीवर तामिळनाडूत अनेकदा राज्य मिळवलेलं बघितलं. त्यांना कशाप्रकारे त्रास सहन करावा लागला हे पाहिलं, असे अजित पवार म्हणाले.
“कित्येक महिलांची नावं देशातील वेगवेगळ्या राज्यात मुख्यमंत्री झालेली घेता येतील. हा शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, इथंही ते होईल. कारण हा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा, राजमाता जिजाऊंचा,सावित्रीबाई फुले, रमाई माता, तारा राणींचा महाराष्ट्र आहे. या अशा अनेक महिला या महाराष्ट्राला मिळालेल्या आहेत, त्यांचं कर्तृत्व महिलांनी बघितलं आहे, त्यामुळं तो दिवस फार लांब असेल, असं मला वाटत नाही, “असं अजित पवार यांनी सांगितलं. Ajit Pawar |
“आम्ही पण महिलांना संधी देण्याचा प्रयत्न करत आहोत. मुख्यमंत्री यांनी महायुती सरकारचा १०० दिवसांचा कार्यक्रम दिला होता त्यात अदिती तटकरे यांच्या खात्याला पहिला क्रमांक मिळाला. महिला कुठं मागं नाहीत हे त्यांनी दाखवून दिलं, असेही अजित पवार म्हणाले.




