IDBI Bank : आयडीबीआय बँकेची कमान आता फेअरफॅक्सकडे? IITचे प्रेम वत्स ठरले चर्चेतील नाव
IDBI Bank : IDBI बँकेतील सरकार आणि LIC ची 60.72% हिस्सेदारी फेअरफॅक्सला 52,878 कोटी रुपयांना विकण्यास मंजुरी. जाणून घ्या प्रेम वत्स आणि व्यवहाराची माहिती.

IDBI Bank : केंद्र सरकार आणि एलआयसीची आयडीबीआय बँकेतील 60.72 टक्के हिस्सेदारी फेअरफॅक्स फायनान्शियल होल्डिंग्सला विकण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. भारतीय वंशाचे प्रेम वत्स यांच्या नेतृत्वाखालील फेअरफॅक्स ही हिस्सेदारी सुमारे 52,878 कोटी रुपयांना खरेदी करणार आहे. मात्र, व्यवहार पूर्ण करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेची मंजुरी आवश्यक आहे.
टोरंटोस्थित फेअरफॅक्सचा विमा, पुनर्विमा आणि गुंतवणुकीचा व्यवसाय आहे. कंपनी 100 पेक्षा जास्त देशांत कार्यरत असून भारतात थॉमस कुक आणि बंगळुरू विमानतळाशी संबंधित व्यवसायांतही तिची गुंतवणूक आहे.
प्रेम वत्स यांचा जन्म 1950 मध्ये हैदराबादजवळ झाला. त्यांनी आयआयटी मद्रासमधून पदवी घेतल्यानंतर कॅनडातील युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ओंटारियोमधून एमबीए केले. सुरुवातीच्या काळात त्यांनी घराघरांत जाऊन एसी विकण्याचे कामही केले.
1974 मध्ये त्यांनी विमा क्षेत्रात गुंतवणूक विश्लेषक म्हणून कारकीर्द सुरू केली. 1984 मध्ये त्यांनी स्वतःची गुंतवणूक कंपनी सुरू केली. पुढे हीच वाटचाल फेअरफॅक्सच्या उभारणीपर्यंत पोहोचली. त्यामुळे वत्स यांना कॅनडाचे ‘वॉरेन बफे’ असेही म्हटले जाते.
फेअरफॅक्स आयडीबीआय बँकेसाठी प्रति शेअर 81 रुपये देणार आहे. सरकारच्या स्वतंत्र मूल्यांकनातील 75.99 रुपयांच्या तुलनेत ही किंमत अधिक आहे. सरकार 30.48 टक्के, तर एलआयसी 30.24 टक्के हिस्सा विकणार आहे.
जून 2026 पर्यंत आयडीबीआय बँकेची एकूण मालमत्ता 4.44 लाख कोटी रुपये होती. बँकेच्या देशभरात 2,000 पेक्षा जास्त शाखा आहेत. सप्टेंबर 2018 मध्ये सुमारे 32 टक्के असलेले बँकेचे सकल एनपीए जून 2026 मध्ये 2.3 टक्क्यांवर आले आहे. म्हणजेच बँकेच्या बुडीत कर्जाचे प्रमाण पूर्वीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे.





