सांगली : सांगलीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आजकाल सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर होताना दिसत आहे. याच सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झालेल्या एका तरुणाने एका तरुणीशी लग्न केले पण काही दिवसांतच तिने दुसरा निर्णय घेऊन त्याला सोडचिट्ठी दिली. यानंतर या तरुणीने टोकाचा निर्णय घेतल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. काय घडले नेमके? शेखर गायकवाड असे त्या तरुणाचे नाव आहे. त्याची फेसबुकच्या माध्यमातून एका तरुणीशी ओळख झाली होती. त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले.पुढे त्यांनी लग्नदेखील केले. मात्र त्यांचे हे लग्न जास्त काळ टिकले नाही. त्या तरुणीने शेखरला सोडचिट्ठी देऊन दुसऱ्यासोबत आपला संसार थाटला. याचाच राग आल्याने शेखर गायकवाड याने इचलकरंजी पोलीस स्टेशनच्या समोर आपला संताप व्यक्त स्वतःला पेटवून घेतले. या दोघांनी लग्न केल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस चांगले गेले. मात्र यानंतर या दोघांमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून खटके उडायला सुरुवात झाली. शेवटी शेखरबरोबर आता राहायला नको, असा विचार मनाशी घट्ट करून त्याच्या बायकोने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. घटस्फोट घ्यायला नको, अशी विनवणी शेखर करीत होता. मात्र पुढे मागे काहीही न बघता तिने काडीमोड घेतला. काही दिवसांपूर्वीच त्यांचा घटस्फोट झाला होता. यानंतर या तरुणीने लगेचच दुसऱ्या तरुणासोबत लग्न केले. याची माहिती शेखरला समजताच त्याची तळपायाची आग मस्तकात गेली. हे सगळं सहन न झाल्याने त्याने इचलकरंजी पोलीस स्टेशन गाठले. पोलीस ठाण्याच्या आवारात त्याने स्वतःवर पेट्रोल टाकून पेटवून घेतले. अचानक घडलेल्या घटनेमुळे पोलिसांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. या घटनेत शेखर चांगलाच भाजला आहे. त्याला जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.