ICC चा ऐतिहासिक निर्णय! WC स्पर्धेत पहिल्यांदाच ‘हे’ घडणार

मुंबई: येत्या काही दिवसांत आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप 2025 ला भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने सुरुवात होणार आहे. 30 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेसाठी सर्व संघांनी आपल्या निवडी जाहीर केल्या असून, भारतीय संघाचं नेतृत्व कर्णधार हरमनप्रीत कौरकडे, तर उपकर्णधारपद स्मृती मंधानाकडे सोपवण्यात आलं आहे. भारतात अनेक वर्षांनी होणाऱ्या या स्पर्धेसाठी बीसीसीआयने जोरदार तयारी केली आहे. दरम्यान, स्पर्धेच्या आधी आयसीसीने एक ऐतिहासिक निर्णय घेत सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
आयसीसीचा ऐतिहासिक निर्णय
आयसीसीने या वर्ल्डकपसाठी केवळ महिला अंपायर्स आणि मॅच रेफ्रींची नियुक्ती करून इतिहास रचला आहे. ही पहिलीच आयसीसी स्पर्धा आहे, जिथे सर्व अधिकारी महिला असतील. या निर्णयाचं सर्वत्र कौतुक होत आहे. भारताच्या माजी क्रिकेटपटू आणि पहिल्या महिला मॅच रेफ्री जीएस लक्ष्मी या चार सदस्यीय मॅच रेफ्री पॅनलचा भाग असतील. मॅच रेफ्रींमध्ये जीएस लक्ष्मी यांच्यासह मिशेल परेरा, ट्रूडी अँडरसन आणि शेंड्रे फ्रिट्ज यांचा समावेश आहे.
अंपायरिंगची जबाबदारी जॅकलिन विलियम्स, सू रेडफर्न, क्लेयर पोलोसेक, लॉरेन एजेनबेग, किम कॉटन, वृंदा राठी, एन जननी, केंडेस ला बोर्डे, सारा दंबनेवाना, शथीरा जाकीर जेसी, केरिन क्लास्टे, निमाली परेरा, एलोइस शेरीडन आणि गायत्री वेणुगोपालन यांच्यावर सोपवण्यात आली आहे. या निवडीमुळे स्पर्धेच्या व्यवस्थापनात लैंगिक समानतेचा संदेश देण्यात आला आहे.
भारतीय संघाचं जेतेपदाचं स्वप्न
भारतीय महिला संघ या स्पर्धेत जेतेपद मिळवण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघाला स्मृती मंधानाची उपकर्णधार म्हणून मजबूत साथ मिळेल. भारताने आजवर महिला वनडे वर्ल्डकपचं जेतेपद पटकावलेलं नाही. त्यामुळे स्वतःच्या देशात खेळताना ट्रॉफी उंचावण्याचं भारताचं लक्ष्य आहे. संघाने यासाठी जोरदार सराव आणि रणनीती आखली आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यात संयुक्तपणे आयोजित होणारी ही स्पर्धा क्रिकेटप्रेमींसाठी उत्साहाची पर्वणी ठरणार आहे. बीसीसीआयने स्पर्धेच्या आयोजनासाठी सर्वंकष तयारी केली आहे. सर्व संघ सज्ज असून, भारतीय संघ आपल्या मायभूमीवर इतिहास रचण्यासाठी सज्ज आहे. आयसीसीच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे स्पर्धेची रंगत आणखी वाढली आहे, आणि महिला क्रिकेटला नवं उभारी मिळण्याची अपेक्षा आहे. या वर्ल्डकपमधून भारतीय संघ आणि आयसीसीच्या महिला अधिकाऱ्यांचा दबदबा पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमी उत्सुक आहेत.





