ICC WTC Final 2023 : ऑस्ट्रेलियाच्या संघाला केवळ कोहलीचीच भीती – पॉंटिंग

मेलबर्न – जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाची कुख्यात मीडिया ट्रायल सुरु झाली आहे. याचेच प्रत्यंतर त्यांचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंगने व्यक्त केलेल्या मतांवरून येत आहे. संपूर्ण ऑस्ट्रेलियाच्या संघाला भारताच्या केवळ विराट कोहलीचीच भीती वाटते, असे सांगत त्याने भारतीय संघाच्या अन्य फलंदाजांना डिवचले आहे.
कोहलीने चार वर्षांनंतर आयपीएलमध्ये शतक फटकावले. इतकेच नव्हे तर त्याने या स्पर्धेत सलग दुसरे शतकही साकार केले. त्या सध्याचा फॉर्म पाहता तो कसोटी स्पर्धेच्या अंतिम लढतीत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसाठी डोकेदुखी ठरेल, असे पॉंटिंगने सागितले आहे.
कोहली असाच खेळत राहिला तर तो ऑस्ट्रेलियाला जिंकू देणार नाही. मी कोहलीला यंदा या आयपीएल स्पर्धेदरम्यान भेटलो होतो, जेव्हा आम्ही बंगळुरूमध्ये खेळलो होतो. मी त्याच्याशी त्याच्या फलंदाजी आणि त्याच्या कारकिर्दीबद्दल संवाद साधला. तो आयपीएलमध्ये खूप चांगला खेळला. त्यामुळे त्याला लवकर बाद करण्यासाठी सर्व ऑस्ट्रेलियन खेळाडू विचार करतच असतील, असेही त्याने म्हटले आहे.
दोन वर्षांच्या सुमार कामगिरीनंतर कोहली त्याच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये परतला आहे. कोहलीने गेल्या वर्षी आशिया कपमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध शतक फटकावून पुनरागमन केले होते. टी-20 विश्वचषकात विराटने पुन्हा चमकदार कामगिरी केली. कोहलीने गेल्या काही महिन्यांत क्रिकेटच्या तिनही प्रकारात दमदार कामगिरी केली आहे. त्याच्या जबरदस्त फॉर्मने ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या मनात दहशत निर्माण केली आहे. जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताची आघाडीची फळी आणि ऑस्ट्रेलियाचे वेगवान गोलंदाज यांच्यात चांगली लढत पाहायला मिळेल, असेही तो म्हणाला.





