भारतीय संघ WTC चा अंतिम सामना खेळणार? ‘या’ संघांच्या कामगिरीवर अवलंबून असेल गणित

ICC World Test Championship: भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधील 5 सामन्यांची सीरिज सध्या 1-1 बरोबरीत आहे. स्पर्धेतील चौथा सामना 26 डिसेंबरला मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाणार आहे. दोन्ही संघांचा हा सामना जिंकत मालिकेत आघाडी घेण्याचा प्रयत्न असेल. याशिवाय, विजेत्या संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) 2023-25 च्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी देखील मदत होईल.
केवळ 8 सामने बाकी
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात कोणते संघ पोहोचतील याचे चित्र अद्याप स्पष्ट नाही. चॅम्पियनशीपचे अजून 8 सामने बाकी असून, भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका हे चारही संघ सध्या स्पर्धेत आहेत. तर इतर संघ स्पर्धेतून बाहेर पडले आहेत.
सध्या WTC च्या गुणतालिकेत दक्षिण आफ्रिका 63.33 विजयी टक्क्यांसह पहिल्या स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलिया आणि भारत अनुक्रम दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहे. भारताचे गुणतालिकेत 55.88 टक्के आणि ऑस्ट्रेलियाचे 58.89 विजयी टक्केवारी आहे. या स्पर्धेतील भारताचे दोन सामने बाकी असून, हे दोन्ही सामने ऑस्ट्रेलियाविरोधात आहेत.
WTC च्या अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी भारतासाठीचे गणित कसे असेल?
भारतीय संघाला अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धचे दोन्ही सामने जिंकावे लागतील. दोन्ही सामने ड्रॉ झाले अथवा पराभव झाल्यास भारताचे गणित इतर संघांच्या निकालावर अवलंबून असेल. जर भारतीय संघ मालिकेत 2-1 ने विजयी झाला, तर श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या दोन सामन्यांच्या मालिकेतील 1 सामना ड्रॉ होईल व दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा पाकिस्तानकडून पराभव होईल, अशी आशा ठेवावी लागेल.
ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका 2-2 अशी ड्रॉ झाल्यास, गुणतालिकेत भारताची 55.26 विजयी टक्केवारी असेल. अशावेळी भारतीय संघाला अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी श्रीलंकेला ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका 1-0 अथवा 2-0 जिंकावी लागेल आणि पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेला 2-0 ने हरवावे लागेल.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील पुढील दोन्ही सामने ड्रॉ झाल्यास भारताचे 55.51 गुण असतील. अशावेळी अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी पाकिस्तानला दोन्ही सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करावा लागेल. तर श्रीलंकेला ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका 1-0 अथवा 2-0 जिंकावी लागेल. श्रीलंका-ऑस्ट्रेलिया मालिका ड्रॉ झाल्यास ऑस्ट्रेलियाचे देखील भारताएवढेच गुण असतील. अशावेळी चॅम्पियनशीपमध्ये सर्वाधिक मालिका जिंकल्यामुळे भारत पुढे असेल.
बॉर्डर गावस्कर सीरिजमध्ये भारताचा 1-2 असा पराभव झाल्यास, भारतीय संघ अंतिम सामन्याच्या स्पर्धेतून थेट बाहेर होईल.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 मधील उर्वरित सामने
भारत vs ऑस्ट्रेलिया
चौथी कसोटी: मेलबर्न, 26-30 डिसेंबर
पाचवी कसोटी: सिडनी, 3-7 जानेवारी
पाकिस्तान vs दक्षिण आफ्रिका
पहिली कसोटी: सेंचुरियन, 26-30 डिसेंबर
दुसरी कसोटी: केपटाउन, 3-7 जानेवारी
पाकिस्तान vs वेस्टइंडीज
पहिली कसोटी: कराची, 16-20 जानेवारी
दुसरी कसोटी: मुल्तान, 24-28 जानेवारी
श्रीलंका vs ऑस्ट्रेलिया
पहिली कसोटी: गॉल, 29 जानेवारी-2 फेब्रुवारी
दुसरी कसोटी: गॉल, 6-10 फेब्रुवारी
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम सामना – लॉर्ड्स, 11-15 जून





